नवी दिल्ली, काँग्रेसप्रणित इंडी आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह २० नेते प्रस्तावक बनले.
नामांकनाच्या वेळी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संसद संकुलातील प्रेरणा स्थळावर महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
नामांकन दाखल केल्यानंतर बी सुदर्शन रेड्डी म्हणाले की, ही निवडणूक केवळ एका व्यक्तीची निवडणूक नाही, तर भारताच्या कल्पनेशी जोडलेली आहे जिथे संसद प्रामाणिकपणे काम करते, मतभेदांचा आदर केला जातो आणि संस्था स्वातंत्र्य आणि निष्पक्षतेने लोकांची सेवा करतात. रेड्डी पुढे म्हणाले की, जर ते निवडून आले तर ते उपराष्ट्रपती पद निष्पक्षता, सन्मान, संवाद आणि सौजन्याने पार पाडतील.