सर रामकृष्णपंत : स्मृतिशताब्दी

22 Aug 2025 21:42:23

राजकारण करण्यासाठी एक वेगळा स्वभाव लागतो. न्या. रानडे आणि लोकमान्य टिळक हे ज्ञानपिपासू आणि ज्ञानप्रसारक होतेच; पण त्यांनी आपली ऊर्जा राजकीय चळवळीकडे वळवली. रामकृष्णपंत हेदेखील ज्ञानपिपासू आणि ज्ञानप्रसारक होते. आपल्या दीर्घ आयुष्यात त्यांनी अखंड ज्ञानसाधना केली. ऐतिहासिक घटनांचा प्रमाणशुद्ध अन्वयार्थ लावून प्राचीन भारताच्या इतिहासाची मांडणी कशी करावी, याचा आदर्श त्यांनी घालून दिला. दि. २४ ऑगस्ट ही त्यांची स्मृतिशताब्दी. त्यानिमित्ताने...


दि. १८ जुलै १८५७ या दिवशी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्याचे संस्थापक होते, जॉन विल्सन, जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट आणि डॉ. भाऊ दाजी. जॉन विल्सन हा विद्यापीठाचा पहिला कुलगुरू बनला. विद्यापीठ हे इंग्लंडमधल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’च्या कित्त्यानुसार काम करेल, असे ठरवण्यात आले.

मुंबईत याआधीच दोन महाविद्यालये निघालेली होती. १८३५ साली एल्फिन्स्टन कॉलेज सुरू झाले होते. हे विद्यार्थ्यांना ‘बॅचलर ऑफ आटर्स’ची पदवी देत असे, तर ग्रँट मेडिकल कॉलेज १८४५ साली सुरू होऊन ते वैद्यकीय पदवी देत असे. १८५७ साली विद्यापीठ स्थापन झाल्यावर ही दोन्ही महाविद्यालये विद्यापीठाला जोडण्यात आली. पुढे १८६२ साली मुंबई विद्यापीठातून पहिले चार विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडले. त्यातले एक होते महादेव किंवा माधव गोविंद रानडे. पुढच्या काळात ते ‘न्यायमूर्ती रानडे’ या नावाने प्रख्यात झाले. दुसरे होते रामकृष्ण गोपाळ भांडारकर.

न्यायमूर्ती रानड्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याबद्दल खुद्द लोकमान्य टिळक लिहितात की, "थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला जिवापाड मेहनतीने पुन्हा जिवंत करण्याचे काम सर्वप्रथम रानड्यांनी केले.” इतिहास, भाषा आणि धर्म यांसंदर्भात हेच काम भांडारकरांनी केले, असे म्हणता येईल, भांडारकर घराणे मूळचे वेंगुर्ल्याचे. त्यांचे मूळ आडनाव पत्की. परंतु, त्यांचा कोणीएक पूर्वज भांडाराचा म्हणजे खजिन्याचा प्रमुख असल्यामुळे ‘भांडारकर’ हे आडनाव रूढ झाले. भांडारकर १८६२ साली मुंबई विद्यापीठाचे ‘बी.ए.’ आणि लगेच १८६३ साली ‘एम.ए.’ झाले. म्हणजे इंग्रज सरकारने सुरू केलेल्या नव्या विद्यांमध्ये ते पारंगत झाले. पण, याआधी ते पुण्यात आणि मुंबईत परंपरागत भारतीय विद्याही उत्तम प्रकारे शिकले होते. सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा (म्हणजेच वेदांत) ही भारतीय विद्येची सहा शास्त्रे किंवा षट् दर्शने आहेत. यांपैकी न्याय आणि वेदांत यांचा अभ्यास भांडारकरांनी पारंपरिक पद्धतीने शास्त्री पंडितांजवळ केलेला होता. त्याचप्रमाणे व्याकरण संस्कृत, पाली, अर्धमागधी या भाषांचाही त्यांचा उत्तम अभ्यास होता. थोडक्यात, रामकृष्ण भांडारकर हा तरुण पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही विद्यांमध्ये पारंगत झाला. त्यावेळेला अनेक युरोपीय पंडित भारतासह पूर्वेकडच्या अनेक देशांचा, भाषांचा, संस्कृतींचा अभ्यास करून, त्यांच्या मताने त्यांचा अर्थ लावण्यात गुंतलेले होते. त्यांच्यामध्ये ब्रिटिश होते. फ्रेंच होते आणि जर्मनसुद्धा होते. त्यांना खरीखुरी ज्ञान मिळवण्याची इच्छा अगदीच नव्हती असे नव्हे, पण पूर्वेकडच्या देशांपेक्षा आमची पश्चिमी संस्कृती, भाषा जरा जास्त श्रेष्ठ आहे, असे दाखवून देण्याचा हेतू जरा जास्त होता. धर्मप्रसाराचा हेतूही होताच. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर पुण्या-मुंबईतले पाद्री लोक संत तुकारामांच्या अभंगांचा अभ्यास करून, त्यांना हवा तसा अर्थ लावून, संत तुकाराम हे कसे हिंदू धर्मविरोधी होते, असे सिद्ध करू पाहात होते.

भांडारकरांनी सर्वप्रथम संस्कृत भाषेची दोन शालेय पाठ्यपुस्तके लिहिली. त्यामुळे नव्या इंग्रजी पद्धतीच्या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांची संस्कृत शिकण्याची उत्तम सोय झाली. पुढे ते पुण्याच्या प्रसिद्ध डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक झाले. संस्कृत भाषा आणि एकंदरीतच पौर्वात्य विद्या किंवा प्राच्यविद्या यांसंदर्भात भांडारकरांनी पद्धतशीर काम सुरू केले. उपलब्ध साधनांची चिकित्सा, अभ्यास, जोडणी कशी करावी आणि कसल्याही अभिनिवेशाच्या आहारी न जाता निष्पक्ष, शास्त्रीय निष्कर्ष काढून त्याची मांडणी कशी करावी, याची एक उत्कृष्ट पद्धत त्यांनी विकसित केली. गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांनी ‘हिंदूंची पुराणे म्हणजे शिमगा’ असे एककल्ली विधान केले होते. भांडारकरांनी ते सप्रमाण खोडून काढून पुराणांतल्या अद्भुत भासणार्या कथांमध्ये पुष्कळ ग्राह्य गोष्टी आहेत, असे दाखवून दिले.

सन १८७४ साली लंडनमध्ये ‘इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरिएंटालिस्ट’ म्हणजे आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या विशारदांची परिषद भरली होती. इजिप्तच्या पिरॅमिड्समध्ये जी चित्रलिपी सापडते, तिला ‘हायरोग्लीफ्स’ असे म्हणतात. सन १८०१ मध्ये इजिप्तवर चाल करून गेलेल्या नेपोलियनच्या फ्रेंच सैन्याला एक शिलालेख सापडला. (त्याला म्हणतात ‘रोझेटा स्टोन’) या शिलालेखामुळे ‘हायरोग्लीफ्स’चा उलगडा करता आला. तो ‘रोझेटा स्टोन’ या लंडनच्या परिषदेत मुद्दाम सर्वांना पाहायला ठेवण्यात आला. विशेष म्हणजे, त्याच परिषदेत भांडारकरांचा नाशिक येथील सातवाहनांच्या शिलालेखावरील शोध लेख वाचला गेला.

लक्षात घ्या, हा १८७४चा काळ आहे. या काळात इंग्रज सरकार भारतातली आपली सत्ता अधिकाधिक दृढ करण्याच्या प्रयत्नात होते. त्याचवर्षी महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. पण, त्याकडे दुर्लक्ष करून इंग्रज सरकार भारताची लूट करण्यात मग्न होते आणि त्याचवर्षी गुलाम भारतातला एका विद्वानाचा महत्त्वपूर्ण लेख खुद्द लंडनमधला एका परिषदेत वाचला जात होता. म्हणजे, आयोजक तो डावलून बाजूला ठेवू शकत नव्हते.

तुकाराम महाराजारांच्या अंभंगांच्या अर्थाच्या संदर्भातही भांडारकरांचे चिंतन महत्त्वाचे आहे. तसेच पाली आणि अर्धमागधी भाषांवरील प्रभुत्वामुळे त्यांनी बौद्ध धर्मावरही चिकित्सक लेखन केले.

‘धर्म’ हा भांडारकरांच्या चिंतनाचा खास विषय होता. बायबलमध्ये एकच देव आहे. एकाच देवाची उपासना आहे. आमच्याकडे अगणित देव आणि असंख्य उपासनापद्धती आहेत. त्यामुळे पाद्री लोक आम्हाला भारी पडतात. म्हणून आपणही एकेश्वरी उपासना पंथ काढून पाद्—यांना उत्तर दिले पाहिजे, अशा काहीशा भावनेतून बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज काढला. त्यांचे एक अनुयायी केशवचंद्र सेन यांनी महाराष्ट्रात दौरा करून प्रवचने दिली. त्या प्रभावातून महाराष्ट्रात ‘प्रार्थना समाज’ स्थापन झाला. रामकृष्णपंत १८६९ साली त्याचे सभासद झाले. पण, वेद, उपनिषदे, गीता, साधुसंतांची वचने यांचा आधार घेऊन, स्वतः पदे, कविता रचून, संस्कारविधी तयार करून प्रार्थना समाजाची वैचारिक तत्त्वे पक्की करण्याचे काम भांडारकरांनी केले.

भांडारकरांचे संशोधन कार्य जसे महाराष्ट्राला आवडले, तसे हे धार्मिक कार्य मात्र फारसे पसंत पडले नसावे. कारण, सर्वशक्तिमान परमेश्वराला मानणारा, पण मूर्तिपूजा अमान्य करणारा प्रार्थना समाज महाराष्ट्रात फारसा लोकप्रिय होऊ शकला नाही.

भांडारकरांची ज्ञानसाधना मात्र अखंड सुरू होती. १९११ साली इंग्रज सरकारने त्यांना ‘सर’ हा किताब दिला. त्यांच्या हयातीतच त्यांच्या ८०व्या वाढदिवशी, १९१७ साली त्यांच्या शिष्यांनी पुण्यात ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’ स्थापन केले. आयुष्यभर अखंड विद्याव्यासंग केलेल्या या ॠषितुल्य महापंडिताचे निधन दि. २४ ऑगस्ट १९२५ या दिवशी, वयाच्या ८८व्या वर्षी वार्धयाने झाले. त्यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त नम्र अभिवादन.

पेनांग-सिलिकॉन बेट

अंदमान बेटांकडून आग्नेयेकडे नजर टाकली की, मलेशियन द्विपकल्प नि इंडोनिशियाचे सुमात्रा बेट यांच्यामधून एक अगदी चिंचोळी समुद्र गल्ली गेलेली आपल्याला दिसते. तिला म्हणतात ‘मलाक्काची सामुद्रधुनी.’ एकंदर जागतिक सागरी व्यापारात तिला फार महत्त्व आहे. कारण, ती सामुद्रधुनी ओलांडल्याशिवाय कुणीही दक्षिण चिनी समुद्रात प्रवेशच करू शकत नाही. म्हणूनच मलेशियन द्विपकल्पाच्या अगदी नायावर असलेल्या सिंगापूर या बंदराचे व्यापारी, सैनिकी महत्त्व फार मोठे आहे आणि म्हणूनच सिंगापूरवर ताबा मिळवण्यासाठी पुनःपुन्हा रणकंदने झालेली आहेत.

इंग्रजांची दर्यावर्दी दृष्टी फार सखोल विचार करणारी, हे मान्य केलेच पाहिजे. त्यांनी सिंगापूर जिंकून तिथे एक जबरदस्त नाविक तळ उभारलाच; शिवाय सुमात्रा बेटाच्या समोर मलेशियन भूमीवर आणखी एक नाविक ठाणे उभे केले. त्याचे नाव पेनांग.

आज सिंगापूर बेट हाच एक देश आहे. सिंगापूरने ब्रिटिश वसाहतवादी काळातल्या खाणाखुणा पुसून टाकून एक अत्याधुनिक देश म्हणून मोठीच झेप घेतली आहे. याउलट, पेनांग हा मलेशिया देशाचा एक प्रांत आहे. काल-परवापर्यंत पर्यटक पेनांगला जायचे, ते पूर्वीचे सिंगापूर कसे दिसत होते, त्याचा स्मरणरंजनात्मक अनुभव घ्यायला. तिथल्या ठेल्यांवरच्या नुडल्स-करी नि मिठाया खायला.
पण, आजचे पेनांग ती वसाहतवादी कात टाकून उठत आहे. २०२४ या वर्षात मलेशिया देशाची एकूण निर्यात ११ कोटी, ७० लक्ष डॉलर्स एवढी होती. त्यातला एक तृतीयांश वाटा एकट्या पेनांगचा होता. पेनांगने घेतलेल्या या मोठ्या भरारीचे मुख्य कारण म्हणजे, सेमी कंडटर चिप्स. २०२५ या चालू वर्षात अमेरिका पेनांगमध्ये किमान ८० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करेल, अशी चिन्हे आहेत, तर मार्च २०२५ मध्ये पेनांग प्रांताच्या व्यापार मंत्रालयाने ‘आर्म होल्डिंग्स’ या ब्रिटिश चिप डिझाईन कंपनीशी २५ कोटी डॉलर्सचा करार केला आहे.

गंमत म्हणजे पेनांगमध्ये कुशल कामगार स्वतः सेमीकंडटरचे उत्पादन करतच नाहीत, सेमीकंडटरच्या पातळ कापट्या, ज्यांना ‘वेफर्स’ म्हणतात, त्यांचे शेकडो तुकडे करून ते सर्किटमध्ये लावणे, एवढेच काम ते करतात.
Powered By Sangraha 9.0