‘बालपण संपले’, शुभांगी गोखलेंच्या कुटुंबात दुःखद निधन,‘या’ मालिकेत केलं होतं एकत्र काम

22 Aug 2025 19:25:14


मुंबई : अभिनेत्री शुभांगी गोखले आणि सखी गोखले यांच्या कुटुंबात दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. पण गोखले कुटुंबियच नाही तर मराठी सिनेविश्वासाठीही ही वाईट बातमी आहे. अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या सख्ख्या भावाचं निधन झालं आहे. शुभांगी आणि सखी गोखले यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन ही दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. शुभांगी यांच्या भावाचं नाव रवींद्र संगवई असं आहे.

शुभांगी यांनी रविंद्र यांचा फोटो पोस्ट करुन ही बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. रवींद्र हे देखील काही काळ सिनेविश्वात काम करत होते. फार कमी जणांना माहित असेल की शुभांगी आणि रवींद्र या बहीण-भावाने 'श्रीयुत गंगाधर टिपरे' या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केलं होतं. भावाच्या निधनाने शुभांगी दुःखी झाल्या आहेत.

रवींद्र संगवई हे पेशाने रिझर्व्ह बँकेत एक्झिक्यूटिव्ह चीफ मॅनेजर होते. त्यांनी काही वर्ष सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरीही केली. परंतु करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेत काम केलं होतं. मालिकेत त्यांनी क्षिती जोगच्या वडिलांची भूमिका साकारली होती. अगदी कमी भागात रवींद्र झळकले होते. परंतु त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.



दरम्यान शुभांगी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर भावुक होत एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यांनी म्हटलं,
'बालपण संपले माझे.. रविदादा, खूप एकटं पाडून गेलास', अशा भावुक शब्दात शुभांगी गोखलेंनी भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी रविंद्र यांना श्रद्धांजली वाहून शुभांगी यांना धीर दिला आहे.

तर शुभांगी यांची लेक अभिनेत्री सखी गोखलेनेही आपल्या मामासाठी खास पोस्ट लिहिली आहे, तिने तिच्या लग्नातील मामासोबतचा खास फोटो शेअर करत लिहिलंय,
सखी गोखलेची पोस्ट जशीच्या तशी,



“आयुष्यभर खूप प्रेम केलस, लाड केलेस, मेहनत केलिस. तुझं ज्ञान, समज, कला व साहित्याची आवड आणी दानशूर पणा मी कायम जपीन.
आता मामी, आजी, डैडी आणि मामा सोबत तू सुद्धा आमच्यावर लक्ष थेव. मात्र आता थोडी विश्रांति घे. तुझी खूप आठवन यैल बघ, मामा.”


Powered By Sangraha 9.0