महसूल विभाग राबवणार 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान'; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

22 Aug 2025 20:57:21

मुंबई :
महसूल विभागाच्या वतीने दि. ७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "सर्व विभागीय आयुक्तांना पंधरवड्याच्या नियोजनाबाबत पत्र लिहिले आहे. १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताहात महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेची कामे तत्परतेने पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत, राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान युद्धपातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचदरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या अभियानातून जनतेची कामे आणि शेती आणि शेतकरी विकासासाठी महसूल विभागाने जाहीर केलेल्या योजना प्रयत्नपूर्वक घरोघरी, बांधावर पोचविण्याचा करण्याचा निर्धार महसूल विभागाने केला आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,तलाठी असे सर्वचजण यासाठी सक्रिय भूमिका निभावणार आहेत."

तीन टप्प्यांत अभियान

पंधरा दिवसांचे तीन टप्पे करण्यात आले असून, शेतकरी , विद्यार्थी, महिला, यासह समाजातील सर्वच घटकांना यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. पहिल्या टपप्यात पाणंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 'सर्वांसाठी घरे' उपक्रमावर भर दिला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे आणि सुरक्षित घर मिळावे, यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी सर्वसामान्यांच्या घरांसाठी जमीन उपलब्ध करून देणे किंवा अतिक्रमणे नियमानुकूल करण्याकरिता क्षेत्रीय यंत्रणेने सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि पट्टेवाटपाचा कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरावर नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार आपापल्या जिल्ह्यांमध्ये राबवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

"सर्व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानात सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. याचा सर्वसामान्य जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हे अभियान लोकाभिमुख महसूल विभागाची क्रांतिकारी जनचळवळ होईल."

- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री



Powered By Sangraha 9.0