मुंबई : “देशभक्ती ही केवळ स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनापुरती मर्यादित नसावी, तर ती आपल्या दैनंदिन वर्तनाचा भाग असायला हवा", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. मध्यप्रदेशच्या खंडवा येथे आयोजित सेवा संस्था बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मालवा प्रांताचे संघचालक डॉ. प्रकाश शास्त्री देखील उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत भैय्याजी जोशी पुढे म्हणाल, सेवेचा परिणाम केवळ तात्कालिक मदतीपुरता मर्यादित नसावा. सेवेचे अंतिम उद्दिष्ट आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि स्वावलंबन जागवून असे व्यक्तिमत्त्व घडवणे असावे, जे पुढे जाऊन समाजसेवेत स्वतःला समर्पित करू शकेल. सामाजिक कार्याचा परिघ चार शब्दांभोवती फिरतो – सेवा, संस्कार, जागरूकता आणि सामाजिक सुधारणा. याच तत्वांवर आधारित समाज घडवला गेला तर तो सशक्त आणि प्रगत होईल. आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते, हे आपले भाग्य आहे. सेवा म्हणजे केवळ मदत नाही, तर ज्याची सेवा केली जाते त्या व्यक्तीला ईश्वर मानून केली गेली पाहिजे, त्यामुळे अहंकारही नाहीसा होतो.”
भाषेचे आणि स्वदेशीचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले की, "चीन, जपान आणि रशिया यांनी इंग्रजीला व्यवहार्य भाषा म्हणून स्वीकारलेले नाही, तरीही ते विकसित देश आहेत. म्हणून भारतानेही आपल्या मातृभाषेवर आणि स्वदेशी तत्त्वांवर अभिमान बाळगायला हवा. स्वदेशी ही मजबूत अर्थव्यवस्थेची पायाभूत गरज आहे आणि आजच्या काळात ती अत्यंत आवश्यक आहे."
भैय्याजी जोशी यांनी पंच परिवर्तनातील नागरी कर्तव्य या बिंदूवर देखील भर दिला. ते म्हणाले की, “भारतीय माणसे चांगली आहेत, पण देशाची प्रतिष्ठा ही नागरिकांच्या शिस्तपालनातून वाढते. तसेच समाजातील कुप्रथा दूर करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय समाज पारंपरिकरित्या निसर्गपूजक आहे, म्हणूनच प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ पर्यावरणासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. विशेषतः झाडे लावा, पाणी वाचवा आणि प्लास्टिक हटवा यासाठी तसेच सिंगल-यूज प्लास्टिकला पूर्णपणे 'नाही' म्हणण्यासाठी त्यांनी आग्रह व्यक्त केला."
कुटुंब प्रबोधनाविषयी बोलताना ते म्हणाले, "भारताची कुटुंब व्यवस्था ही आपल्या समाजाची सर्वात मोठी ताकद आहे. या व्यवस्थेने हजारो वर्षांपासून समाजाला स्थैर्य आणि बळ दिले आहे. माणसाचे जीवन परस्परावलंबी असते आणि एकमेकांशिवाय त्याची कल्पनाही करणे कठीण आहे."
आपल्या उद्बोधनाच्या शेवटी त्यांनी सर्व सेवाभावी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, सेवा कार्याच्या माध्यमातून समाजाला आत्मनिर्भर, आत्मसन्मानयुक्त, आत्मविश्वासपूर्ण आणि संस्कारयुक्त व्यक्तिमत्त्वाच्या दिशेने पुढे घ्या.