घुसखोरांना पोसण्याचे काँग्रेस राजदचे धोरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

22 Aug 2025 17:35:25

नवी दिल्ली : बिहारच्या सीमावर्ती भागांत बेकायदा घुसखोरांची संख्या धोकादायक वेगाने वाढत असून स्थानिक लोकसंख्येचे स्वरूपच बदलवण्याचा हा कट आहे. बिहारच्या जनतेचे हक्क, रोजगार आणि संधी हिसकावून घेऊन घुसखोरांना दिले जावेत, असा डाव काँग्रेस व राजद या दोन्ही पक्षांचा असून देशाच्या सुरक्षेला गालबोट लावण्याचे हे षड्यंत्र आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारच्या गया येथील जाहिर सभेत केला.

लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपण घुसखोरांच्या धोक्याचा इशारा दिला होता. बिहारलाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. सीमावर्ती भागात लोकसंख्येचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. ही परिस्थिती देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर आहे. घुसखोरांच्या हातात बिहारच्या नागरिकांचे भवितव्य कधीच सोपवले जाणार नाही, त्यासाठी भाजपप्रणित रालोआचे सरकार कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

घुसखोरीच्या या संकटाला आळा घालण्यासाठी ‘हाय-पॉवर डेमोग्राफी मिशन’ची घोषणा केली असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, हे मिशन लवकरच सुरू होईल. देशातील प्रत्येक बेकायदा घुसखोराला हद्दपार करण्यासाठी रालोआ सरकार कारवाई करणार आहे. भारताच्या भूमीवर घुसखोरीच्या राजकारणाला आणि घुसखोरांच्या ताकदीला कधीच वाढू देणार नाही. बिहारच्या जनतेचे रोजगार, संधी आणि हक्क यावर घुसखोरांचे डोळे आहेत, मात्र रालोआ सरकार त्यांना पाय रोवू देणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.

काँग्रेस व राजदवर हल्ला चढवत पंतप्रधान मोदींनी स्पष्ट आरोप केला की, हे पक्ष घुसखोरांना पाठीशी घालून त्यांच्या बळावर लांगुलचालनाचे राजकारण करत आहेत. मतदारसंघ वाढवण्यासाठी बिहारच्या जनतेचे हक्क लुटून ते घुसखोरांना देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. हे थेट देशद्रोहाचे राजकारण आहे. बिहारच्या जनतेने या घुसखोर समर्थकांपासून सावध राहिले पाहिजे. घुसखोरी हा फक्त बिहारसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी धोका आहे. समाजाचे संतुलन, सुरक्षेची भिंत आणि भावी पिढ्यांच्या संधी यावर या बेकायदा घुसखोरांचा डल्ला आहे. या देशद्रोही कटाला चिरडून टाकण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. बिहारच्या जनतेने आता डोळसपणे निर्णय घ्यावा आणि घुसखोरांचे राजकारण करणाऱ्यांना कायमचे बाहेर फेकावे, असेही आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले आहे.


Powered By Sangraha 9.0