मुंबई : विरोधकांच्या डोक्यात जातीवाद असल्याने त्यांनी एकाच महामंडळाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांना जनतेच्या कामाशी देणेघेणे नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी केली.
परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या नियूक्तीवरूनही विरोधकांनी टीका केली. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “विरोधकांच्या डोक्यात जातीवाद असल्याने त्यांनी एकाच महामंडळाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांना जनतेच्या कामाशी देणेघेणे नाही. आता सगळीच महामंडळे सक्रीय होत आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. सगळी महामंडळे तयार करत असताना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संचालक नेमले आहेत. पण आता विरोधकांच्या पोटात का दुखते? आम्ही समाजातील सामान्य माणसाला मदत करण्यासाठी महामंडळे तयार करून त्याची पुर्नरचना करत असून तर त्याचे स्वागत केले पाहिजे. त्यांनी समाजातील कुठल्याही घटकासाठी कधीच काही केले नाही. त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गुंडाळून ठेवले होते. मी आणि एकनाथ शिंदे यांनी त्याला बळ दिल्याने आम्ही मराठा समाजात दीड लाख उद्योजक तयार करू शकलो. ओबीसी महामंडळाची पुर्नरचना तयार केली. वेगवेगळ्या समाजाची महामंडळे आम्ही तयार केली. त्यातून उद्योजक तयार होत आहेत. तर यांच्या पोटात का दुखते?” असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नवीन वॉररुम बनवली असून त्याबद्दल माहिती देताना ते पुढे म्हणाले की, “जागतिक जिओपॉलिटिकल परिस्थितीत आपल्यासमोर काही देश त्या ठिकाणी ट्रेड चॅलेंजेस उभे करत आहेत. अशा परिस्थितीत या आव्हानांचे संधीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे तयार झालेल्या ट्रेड बॅरियर्समधून मार्ग करण्यासाठी पर्यायी बाजारपेठा कशा तयार करता येतील. इज ऑफ डुइंग बिझनेस कसा करता येईल? अशा प्रकारे उद्योगात सुलभता आणण्यासाठी शंभर सुधारणा आम्ही करणार आहोत. त्यासाठी आम्ही समिती तयार केली आहे असून वॉर रुमच्या माध्यमातून दरमहिन्याला किती सुधारणा केल्या याचा आढावा घेणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे-शरद पवार यांना फोन“उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीच्या निमित्ताने मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही फोन केला होता. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे, मुंबईचे मतदार आहेत. आपले राज्यपाल आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी समर्थन द्यावे, अशी विनंती मी त्यांना केली. उद्वजींनी आम्ही सर्वांशी चर्चा करू असे सांगितले. तसेच शरद पवार यांनी विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केल्याने आम्हाला त्यांच्यासोबत जावे लागेल असे सांगितले. पण एक कर्तव्य म्हणून मी त्यांना फोन केला होता,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
...म्हणून राज ठाकरेंची भेट
“ज्यावेळी प्रचंड पाऊस होतो त्यावेळी पायाभूत सुविधांवर त्याचा परिणाम होत असतो. कमी कालावधीत जास्त वेगाने पाऊस पडल्याने पायाभूत सुविधांवर त्याचा परिणाम झाला आहे. परंतू, उघाड पडल्याबरोबर अशा प्रकारच्या आम्ही सुधारणा करणार आहोत. राज ठाकरे यांनी काल ट्रॅफिकच्या समस्येसंदर्भात काही चांगल्या सूचना केल्या असून त्याचा विचार आम्ही करू,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्वयंसेवक असल्याचा अभिमान
खा. सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्यामुळे विरोधकांच्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काही बंदी असलेली संघटना नाही. मी स्वत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असून मला त्याचा अभिमान आहे. मला संघाने नेहमी राष्ट्रवाद शिकवला, समाजातील प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन देशाचे कल्याण करायचे शिकवले. त्यामुळे कुणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेल्यास त्यासाठी एवढा आकांततांडव करण्याची आवश्यकता काय आहे?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधींनीच मतचोरीचा कॉन्ट्रॅक्ट घेतला
"पृथ्वीराज चव्हाण यांच्यासंदर्भात आ. अतुलबाबा भोसले यांनी जे सत्य समोर आणले त्यातून खरे वोट चोर कोण आहे ते स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांनीच सगळा मतचोरीचा कॉन्ट्रॅक्ट घेतला असून त्यांचेच लोक मतांची चोरी करतात, हे लक्षात आले आहे. त्यामुळे राहुल गांधींनीच याचे उत्तर दिले पाहिजे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.