नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी मॉस्को येथे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला तसेच वर्षाअखेर होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेच्या तयारीबाबत चर्चा केली.
जयशंकर यांनी सांगितले की, या बैठकीमुळे राजकीय संबंधांसह द्विपक्षीय सहकार्याची दिशा ठरविण्याची संधी मिळाली आहे. आमचे नेते सतत या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत, असे ते म्हणाले. या भेटीत विविध सहकार्य क्षेत्रांवर सखोल चर्चा झाली असून शिखर परिषदेच्या वेळी जास्तीत जास्त फलश्रुती मिळावी यासाठी संवाद सुरू राहतील, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. जागतिक भू-राजकीय बदल, व्यापारातील फेरबदल आणि ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने या पार्श्वभूमीवर भारत-रशिया संवादाचे महत्त्व अधोरेखित झाले.
बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत तेल खरेदीच्या प्रश्नावर बोलताना जयशंकर यांनी स्पष्ट केले की भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. मात्र, सर्वात मोठा खरेदीदार चीन आहे, तर युरोपियन युनियन सर्वाधिक एलएनजी खरेदी करते. २०२२ नंतर रशियासोबतच्या व्यापारात सर्वात मोठी वाढ भारताच्या वाट्याला आलेली नाही. उलट, गेल्या काही वर्षांत अमेरिकेनेच आम्हाला जागतिक ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्यासाठी रशियाकडूनही तेल खरेदी करण्याचे सांगितले आहे. तसेच भारत अमेरिकेकडूनही वाढीव प्रमाणात तेल विकत घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
द्विपक्षीय व्यापारातील असमतोलाबाबतही जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, कृषी, औषधनिर्मिती आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील भारताच्या निर्यातीत वाढ करणे गरजेचे आहे. यासाठी बिगरशुल्क अडथळे आणि नियामक समस्या त्वरित सोडविणे आवश्यक आहे. संरक्षण सहकार्याबाबत बोलताना जयशंकर म्हणाले की, भारत-रशिया संरक्षण सहकार्य दृढ आहे आणि रशिया ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला पाठिंबा देत असून संयुक्त उत्पादन व तंत्रज्ञान हस्तांतरणासही तयार आहे.
युक्रेन, पश्चिम आशिया, मध्यपूर्व आणि अफगाणिस्तानमधील घडामोडींवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. मतभेद मिटविण्यासाठी संवाद आणि कूटनीती हेच मार्ग आहेत, यावर भारताचा कायमचा भर असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. तसेच रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या भारतीयांच्या मुद्यावर त्यांनी रशियाचे लक्ष वेधले. अनेक भारतीयांची सुटका झाली असली तरी काही प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत आणि काही जण बेपत्ता आहेत. रशियाने हे प्रकरण तातडीने निकाली काढावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भारत-रशिया बैठकीतून ऊर्जा, व्यापार, संरक्षण आणि जागतिक घडामोडींवर सहकार्याला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आगामी शिखर परिषदेच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरली आहे.