राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

    21-Aug-2025   
Total Views |

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. विशेषत: बेस्ट कामगार पतपेढीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात दिवसभर या भेटीची चर्चा रंगली होती.

या भेटीत त्या दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी भेटीमागचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, “गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांशी एक-दोन विषयांवर बोलत होतो. टाऊन प्लानिंग हा माझा आवडीचा विषय आहे. आज अनेक शहरांमध्ये पुनर्विकासाची कामे उभी राहत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोष्टीसुद्धा होत आहेत. माणसं वाढत आहेत, ट्राफिक वाढले आहे, रस्ते कमी आहेत, ट्राफिकला शिस्त नाही, आपण कबुतर हत्तीवर अडकलो असून मूलभूत समस्यांकडे लक्ष नाही, पार्किंगसंदर्भात लोकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. यासंदर्भात मी एक छोटासा आराखडा मुख्यमंत्र्यांना दिला,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "हा विषय मला माहितीच नाही. पतपेढी वगैरे त्या निवडणुका स्थानिक आहेत. छोट्या गोष्टी आहेत,” असे म्हणत राज ठाकरे यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....