जीएसटी सुधारणेस मंत्रिगटाची मंजुरी, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

21 Aug 2025 19:01:05

नवी दिल्ली :  वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या मंत्र्यांच्या गटाने जीएसटीच्या ५ टक्के आणि १८ टक्के दरास मान्यता दिली आहे. चैनीच्या वस्तू ४० टक्के दरात येतील. मंत्रिगटाचे संयोजक आऐण बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.

जीएसटीविषयक राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत जीएसटीचे दर तर्कसंगत करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. बैठकीत कर स्लॅब ५ टक्के आणि १८ टक्के कमी करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावावर चर्चा झाली असून त्यास मंत्रिगटाने सहमती दर्शवली आहे. केंद्र सरकारने जीएसटीमध्ये बदल प्रस्तावित केला आहे, ज्यामध्ये १२ टक्के आणि २८ टक्के स्लॅब काढून टाकून फक्त ५ टक्के आणि १८ टक्के असे दोन दर ठेवण्याचे म्हटले आहे. याशिवाय, तंबाखू आणि पान मसाला सारख्या वस्तूंवर ४० टक्क्यांचा विशेष दर लागू करता येईल.

मंत्रिगटाचे संयोजक आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले, केंद्र सरकारने जीएसटीमधील १२ टक्के आणि २८ टक्के करस्लॅब रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला असून, या प्रस्तावाला आमचा ठाम पाठिंबा आहे. या बैठकीत सर्व राज्यांनी सक्रिय सहभाग घेत विविध सूचना मांडल्या, तर काही राज्यांनी काही आक्षेपही नोंदवले. केंद्राच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली असून सर्वसाधारणपणे त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

१२ टक्क्यांवरून ५ टक्के कर – या वस्तू होणार स्वस्त

· सुके मेवे, ब्रँडेड नमकीन, टूथपेस्ट, साबण, हेअर ऑईल

· अँटिबायोटिक्स, पेनकिलर औषधे

· प्रोसेस्ड फूड, स्नॅक्स, फ्रोजन भाज्या, कंडेन्स्ड मिल्क

· मोबाईल, कॉम्प्युटर, शिवणयंत्र, प्रेशर कुकर, गिझर

· इलेक्ट्रिक इस्त्री, व्हॅक्युम क्लीनर

· 1000 पेक्षा जास्त किमतीचे कपडे, रुपये 500-1000 दरम्यानचे बूट

· बहुतांश लसी, एचआयव्ही-टीबी निदान किट

· सायकल, भांडी, जॉमेट्री बॉक्स, नकाशे, ग्लोब

· सार्वजनिक वाहतूक वाहने, कृषी यंत्रसामग्री, सोलर वॉटर हीटर

२८ टक्क्यांवरून १८ टक्के कर – महागड्या वस्तूही होतील स्वस्त

सिमेंट, रेडी-मिक्स काँक्रीट, प्लास्टिक प्रॉडक्ट्स, रबर टायर, ब्युटी प्रॉडक्ट्स, चॉकलेट, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी, डिशवॉशर, प्रोटीन, कॉन्सन्ट्रेट, कॉफी सिरप, साखरेचा सिरप, अ‍ॅल्युमिनियम फॉईल, टेम्पर्ड ग्लास, प्रिंटर, रेझर, मॅनिक्युअर किट, डेंटल फ्लॉस
Powered By Sangraha 9.0