नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी बुधवारी उपराष्ट्रपती पदासाठीचे नामांकन दाखल केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हे नामांकन सादर करण्यात आले.
या प्रसंगी केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रल्हाद जोशी, किरेन रिजिजू, धर्मेंद्र प्रधान, राम मोहन नायडू किन्जारापू, एल. मुरुगन, अर्जुन राम मेघवाल तसेच भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय मंत्री आणि जदयु नेते ललन सिंह, केंद्रीय मंत्री चिराग पासवान, जितनराम मांझी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते. राधाकृष्णन यांनी सुमारे 20 प्रस्तावक आणि 20 समर्थकांच्या उपस्थितीत आपले नामांकन सादर केले.
नामांकनापूर्वी राधाकृष्णन यांनी संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राणी लक्ष्मीबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यांनाही त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.