नेमेचि येतो पावसाळा, मग?

20 Aug 2025 22:09:13
(छाया : अजिंक्य सावंत) 

अगदी आकाश खाली कोसळेल असा पाऊस पडतो. त्यामुळे शहरातील खोलगट भागात पाणी साचते. वाहतुकीच्या साधनांवर मर्यादा येते. मग भर पावसात घराबाहेर पडणार्यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो, हे चित्र दरवर्षीचेच! पण, यंदा मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरली. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नेहमीच येणारा पावसाळा आणि त्यानंतरचा विस्कळीतपणा या सगळ्या गोष्टींची तीव्रता कमी झालेली दिसली. याबद्दल प्रशासन आणि सजग नागरिकांचे अभिनंदन!

मात्र, यंदाच्या पावसाळ्यातही काही अंशी कोलमडणार्या व्यवस्थांना जबाबदार कोण? गेले तीन दिवस प्रशासन इशारा देत होते की, "सतर्क राहा; मुसळधार पाऊस कोसळणार आहे; आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा.” पण, हा इशारा कितीजणांनी गंभीर मानला? अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना त्यांचे नित्यकर्म करणे आवश्यकच असते. त्यामुळे पाऊस त्यांना थांबवू शकत नाही. पण, हातावरचे पोट असणारे अर्थार्जनासाठी भर पावसातही रस्त्यावर आले आणि अडकले. त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. अर्थात रा. स्व. संघ इथेही दक्ष होताच. पण, भर पावसात जीव टांगणीला लावून रेल्वेला लोंबकळणारे ते लाखो-कोटी लोक कोण आहेत? ते आहेत, छोट्या-मोठ्या खासगी कंपनीत, दुकानात, आस्थापनात काम करणारे स्त्री-पुरुष. कंत्राटी कर्मचारी, रोजंदारीवरचे कामगार. भयंकर पावसात कुटुंबासोबत राहावे असे त्यांनाही वाटतेच. पण, ते थांबू शकत नाहीत. कारण, "जग इकडचे तिकडे होवो; कर्मचार्यांनी जीव मुठीत घेऊन का होईना; पण कामाचा दिवस भरायचाच,”असा त्यांच्या कार्यालयांचा, मालकांचा फतवाच! दुसरीकडे सरकारने शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. विद्यार्थ्यांना सुटी होती. मात्र, सगळ्याच शिक्षकांना रजा होती का? तर नाही. हे पाहून वाटते की, सर्वच स्तरातील खासगी आस्थापनांनी अशावेळी कर्मचार्यांप्रति नियमासह थोडीतरी मानवता दाखवावी. अर्थात, ‘पावसामुळे कामधंदे सोडायचे का? मग प्रशासन कशासाठी’ असा प्रश्न विचारला जाईलच. पण, मानवनिर्मित किंवा नैसर्गिक कोणतीही आपत्ती येते, तेव्हा सरकारसोबत नागरिकांचेही कर्तव्य असतेच ना? यंदा प्रशासनाने कर्तव्य तत्परतेची पराकाष्ठा केली. त्यामुळे पावसाळ्याचा त्रास थोडा सुसह्य झाला. ‘नेमेचि येतो पावसाळा,’ त्यानुसार प्रशासन आणि नागरिकांनी सज्ज राहायलाच हवे!

अंधश्रद्धेचा अंत कधी?

त्या भोंदू-ढोंग्यानेे त्या महिलेला सांगितले, "तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी करून दे, तिला माझ्याकडील अघोरी शक्ती देतो.” अघोरी शक्ती आपल्या मुलीला मिळेल; मग आपण काहीही करू शकतो, अशा अंधविश्वासाने तिने तिच्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा त्याच्यासोबत लावून दिला. पुढे मुलीच्या पित्याला कळल्यावर त्याने त्या भोंदूबाबावर गुन्हा दाखल केला. अघोरी शक्तीच्या विळख्यात समाज का फसत आहे?

याबाबत सविस्तर घटना अशी- नाशिकच्या त्या महिलेचे तिच्या पतीसोबत वाद झाले. त्या वादाच्या रागातून ती स्वतःच्या अल्पवयीन मुलीला घेऊन माहेरी निघून आली. इथे तिला एक ढोंगी भोंदूबाबा भेटला. त्या महिलेने मुलीचा साखरपुडा त्याच्याशी लावून दिला आणि लग्नकार्यासाठी मुलीच्या पित्याकडे एक लाख रुपये मागितले. "आपल्याला न सांगता आपल्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा पत्नीने याच्यासोबत कसा केला?” असा प्रश्न त्याने विचारला. यावर "तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी लाव. ती आमचीच आहे, तिला अघोरी व्यक्तीच चालेल,” असे म्हणत, त्या भोंदूबाबाने त्या माणसाला धमकवायला सुरुवात केली. मात्र, त्या माणसाने भोंदूबाबाच्या धमकीला भीक घातली नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल केला. काय म्हणावे? आपली पोटची पोर कोणत्यातरी ढोंग्याला देताना त्या आईला काहीच प्रश्न पडला नसेल? अघोरी विद्या वगैरे प्रकरणावर तिचा इतका विश्वास असावा? या अंधश्रद्धेला काय म्हणावे? दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये १४ वर्षांच्या रौनक नावाच्या मुलीला चिमट्याने चटके देत, मारहाण करून मारून टाकण्यात आले. मांत्रिक चिमट्याने चटके देत होता, तर तिचे आईबाबा त्याला साथ देत होते. का? तर रौनक आजारी होती आणि तिला भूतप्रेतबाधा झाली, असे मांत्रिकाचे म्हणणे. ती बाधा काढण्यासाठी तिला ते मारहाण करीत होते. आधीच आजारी असलेल्या रौनकचा या मारहाणीमध्ये जीव गेला. अंधश्रद्धेचा पगडा समाजमनावर इतका खोल का आहे? भूतप्रेतबाधा, करणी, अघोरी, विद्या वगैरे वगैरेचा विचार करत, काही लोक सत्यापासून दूर का होतात? अंधश्रद्धा निमूर्र्लन कायदा आहे. पण, त्याबाबत सर्वंकष जागृती होणे खरंच गरजेचे आहे. श्रद्धेला विरोध नाही. मात्र, अंधश्रद्धेला थारा नाही हा मंत्र समाजात कसा रुजेल? 
Powered By Sangraha 9.0