आता तुम्ही ‘बेस्ट’ नाही!

20 Aug 2025 18:29:32

‘आम्ही म्हणजे मराठी, आम्ही म्हणजे महाराष्ट्र’ हा ‘ठाकरे ब्रॅण्ड’च्या भ्रमाचा भोपळा काल ‘बेस्ट’ पतपेढी निवडणुकीत पुरता फुटला. पण, ज्या ‘बेस्ट’ला उबाठाच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराने अवकळा आली, आज त्याच ‘बेस्ट’च्या युनियन पतपेढीच्या निकालाने, तुम्ही ‘बेस्ट’ नाही, यावर शिक्कामोर्तब झाले, हा नियतीचाच काव्यगत न्याय!

मागील दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला. असा पावसाळा मुंबईला आणि मुंबईकरांनाही तसा नवीन नाही आणि त्यानंतर उडणारे राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे शिंतोडेही नवे नाही. ब्रिटिशांनी बांधलेल्या पायाभूत सुविधा, तेच नाले, त्याच पर्जन्य जलवाहिन्या आणि त्यातूनच मग सत्तेचे लोणी खाणार्‍या एक परिवाराचे चालणार तरी किती? कधीतरी अशा गोष्टींचा अंत येतोच. आशिया खंडातील एक महत्त्वाचे, जिथे जगाच्या कुठल्याही आर्थिक राजधानीच्या क्षमतेचे अर्थव्यवहार होतात, त्या शहराची तारांबळ थोड्याथोडक्या पावसाने कशी उडते, हे आपण गेल्या दोन-तीन दिवसांत पाहिले. पण, या पावसात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी पुरती धुवून निघाली ती म्हणजे, ठाकरे कुटुंबीयांचा अहंकार! यात ‘उबाठा’ही आले आणि ‘राश्रीठा’सुद्धा आले. निमित्त फार लहान आहे. मात्र, एखाद्या महाकाय पोकळ सांगाड्याच्या कोसळण्याची सुरुवात जशी एखादी सुतळ सुटल्याने होते, तसेच काहीसे मुंबईत घडले.

‘बेस्ट युनियन पतपेढी’ची ही निवडणूक होती आणि या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंनी एकत्र येऊन लढवलेल्या पॅनेलचे शून्य उमेदवार निवडून आले, तर शशांक राव यांच्या पॅनेलचे १४ आणि भाजपप्रणित सहकार समृद्धी पॅनेलचे सात उमेदवार विजयी ठरले. पतपेढी तितकीशी मोठी नाही. मात्र, ‘बेस्ट’ ही आजही बहुसंख्य सर्वच मराठी कर्मचार्‍यांनी चालवलेली निम-सरकारी यंत्रणा आहे. इथले सर्व प्रकारचे कर्मचारी हे बहुतांशी मराठीच. ‘बेस्ट कामगार सेना’ ही शिवसेनेच्या मुंबई ताब्यात ठेवण्याच्या अनेक संघटनांपैकी एक महत्त्वाचे संघटन! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा संघटना सुरुवात केल्या. ‘बेस्ट कामगार संघटने’ची सुरुवात वामनराव महाडिक या बाळासाहेबांच्या खंद्या कार्यकर्त्याने केली. त्यानंतर सुनील गणाचार्य वगैरे ताकदीची माणसे ही युनियन चालवत होती. पण, २५ वर्षे महापालिका स्वतःच्या ताब्यात ठेवल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील ज्या अनेक आस्थापनांकडे ठाकरे कुटुंबाने दुर्लक्ष केले, त्यातील ‘बेस्ट’ ही एक महत्त्वाची संस्था. आजही ‘बेस्ट’ला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परिवहन ही मुंबईकरांसाठीची अत्यंत महत्त्वाची गोष्ट. परंतु, दूरदृष्टी, नियोजन, लोककल्याणाची खरी पोटतिडीक यांपैकी कोणताही गुण नंतर वारस झालेल्या ठाकरेंमध्ये नसल्याने, जे उबाठाचे झाले, तेच ‘बेस्ट’च्या कर्मचार्‍यांचेही झाले. पक्षसंघटना वार्‍यावर सोडायच्या आणि संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यासारख्या बोलघेवड्यांच्या जीवावर पक्ष चालवायचा, हा ठाकरे कुटुंबीयांचा शिरस्ता! पण, असल्या गोष्टी दीर्घकाळ चालत नाहीत. कालची निवडणूक त्याचेच जिवंत उदाहरण.

खरे तर मराठी माणसाला मोठमोठाली स्वप्ने दाखवून त्यांच्या न्याय-हक्कांपासून वंचित ठेवणे, हेच उबाठाचे खरे काम. मराठी माणूस पार उपनगरांच्या पलीकडे फेकला गेला. मात्र, यांच्या एका बंगल्याचे तीन बंगले, चार बंगले होत राहिले. खुशमस्कर्‍यांच्या टोळ्या पाळायच्या; या टोळ्या जे सांगतील तेच खरे म्हणायचे आणि त्यालाच वास्तव मानून सगळ्या गोष्टी करायला लागायच्या. यातून ठाकरे कुटुंबीय एका आभासी जगतात पोहोचले आहे. एकेकाळच्या ‘बंदसम्राट’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या वामनराव महाडिक यांनी ही युनियन खेचून आणली होती. आज कुठल्यातरी आमदाराचा सख्खा भाऊ ही युनियन चालवतो, त्याच्या वकुबाची चर्चा न केलेली बरी! पण, त्याचे परिणाम स्पष्ट आहेत. ‘बेस्ट’मधल्या मराठी कर्मचार्‍यांनी ज्याप्रकारे दोन्ही ठाकरेंना एकत्र येऊन लाथाडले, त्यावरून येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय घडेल, याची कल्पना येऊ शकते. सकाळी ९ वाजता पोपटपंची करायला उभ्या राहणार्‍या संपादकाच्या मते, परवापर्यंत ‘ठाकरे ब्रॅण्ड’ ही निवडणूक भरघोस मतांनी जिंकणार होता. ‘ब्रॅण्ड’ वगैरे या शब्दाचा अर्थ कदाचित त्यांना माहीत नसावा.

वस्तूपेक्षा त्या वस्तूवर लिहिलेल्या नामाभिमानमुळे ती वस्तू विकली जाते, त्याला ‘ब्रॅण्ड’ म्हणतात. इथे वडिलांपासून मुलापर्यंत दोघांनाही निवडून आणण्यासाठी त्यांच्याच पक्षातील अनेकांना स्वतःचे राजकीय करिअर गमवावे लागते. इतकेच नव्हे, तर अन्य पक्षांतून आलेल्या लोकांनास्वतःच्या डोयावर घेऊन नाचावे लागते. मग आता ‘ठाकरे’ हा खरंच ‘ब्रॅण्ड’ आहे का, हा प्रश्न शिल्लक राहतो. खुशमस्कर्‍यांनी त्याच्या कितीही झांजा वाजवल्या, तरीही त्यातून होत काहीच नाही. उलट या निवडणुकीत सारखे अपयशच पदरात पडते. खरे तर ही निवडणूक ही संघटनेची; कोण्या ऐकेकाळी ती उबाठाची ताकदच होती. मात्र, नेताच बावळट मिळाला आणि उधारीच्या लोकांवर पक्ष चालवू लागला की, संघटनेची वाताहात सुरू होते. या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक १४ उमेदवार निवडून आल्यामुळे त्यांचे सर्वप्रथम कौतुक करावेच लागेल. पण, भाजपप्रणित सहकार समृद्धी पॅनेलला हे घवघवीत यश मिळाले. त्यांनी केलेल्या नियोजनाची, कष्टाची, ‘मॅन टू मॅन मार्किंग’ची दखल घ्यावीच लागेल व कौतुकही करावे लागेल. आमदार प्रसाद लाड व आमदार प्रविण दरेकर या दोघांचे नाव इथे घेतले नाही, तर ते अन्यायाचे ठरेल. या दोघांनी प्रचंड कष्ट केले. आजच्या काळात निवडणूक जिंकण्यासाठी जे जे काही करावे लागते, ते ते सर्वकाही केले आणि पॅनेलला विजयाची वाट दाखवली. एका अर्थाने एका मराठी आस्थापनेमधला तथाकथित ‘ठाकरे ब्रॅण्ड’चा दबदबा संपला. दोन्ही भाऊ एकत्र आले, तर ते भाजपचा अश्वमेध मुंबईत रोखू शकतात, अशी कोरडी आशा काही कावळ्यांना वाटत होती. मात्र, ही आशादेखील या निकालाने फोल ठरवली. ‘आम्ही म्हणजे मराठी, आम्ही म्हणजे महाराष्ट्र’ ही स्वतःच स्वतःला सांगितलेली ठाकरे परिवाराची गोष्ट खोटी ठरली. या निकालाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे उद्याच्या निवडणुकीसाठी बारा हत्तींचे बळ येणार आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे!
Powered By Sangraha 9.0