
‘सेक्युलॅरिझम’ हा शब्द आणीबाणीच्या काळात संविधानात अगदी पद्धतशीरपणे पेरण्यात आला, हे आपण जाणतोच. पण, मुळात ‘सेक्युलॅरिझम’ ही संकल्पना पाश्चात्त्य असली तरी त्याचे नेमके मूळ काय, हे समजून घेणेही क्रमप्राप्तच. ख्रिस्ती ‘थिऑलॉजी’च्या पार्श्वभूमीवर उदयास आलेली ‘सेयुलॅरिझम’ची संकल्पना हे खरं तर ‘ ’चे प्रत्युत्तर असल्याने, ते भारतासाठीही निरर्थकच ठरावे. त्याचेच हे चिंतन...
आपल्या भोवती पसरलेल्या या विश्वाच्या अनंत पसार्याचा कोणी नियंता आहे का? का हे सर्व विश्व यादृच्छिकतेने ठरवल्या गेलेल्या काही नियमांना धरून यंत्रवत चाललेले आहे? या वैश्विक खेळात मानवाचे स्थान नेमके कोणते? मानवी संस्कृतीच्या आदिम अवस्थेपासून या प्रश्नांचे उत्तर मानवी संस्कृती शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, असे आपण शिकलो आहोत. मात्र, या प्रश्नांचा जो अर्थ आपल्या भारतीय मनाला अभिप्रेत असतो, तोच अर्थ पाश्चात्य मनालाही अभिप्रेत आहे का? हा प्रश्न वाटतो तितका साधा नाही. कारण, जगन्नियंत्याच्या अस्तित्वाविषयी आणि स्वरूपाविषयी ज्या संकल्पना या प्रश्नांच्या उत्तरातून निर्माण होतात, त्यांचेही स्वरूप या प्रश्नांच्या आकलनानुसार भिन्न असू शकते.
या सर्व प्रश्नांची उत्तरे इतर कोणत्या संस्कृतींनी कोणत्या प्रकारे शोधली ते निश्चित माहीत नाही. परंतु, युरोपात याविषयीची चर्चा सुरू झाली, ती ख्रिस्ती धर्मातील अंतर्विरोधांमुळे. इसवी सनाच्या तिसर्या- चौथ्या शतकात संपूर्ण युरोपभर ख्रिस्ती ‘रिलिजन’चे प्राबल्य निर्माण झाले. या काळातील युरोपची भूमी विविध राजे आणि त्यांचे उमराव यांच्यात विभागली गेलेली होती. रोमन साम्राज्याच्या विनाशानंतर संपूर्ण युरोपवर प्रभाव ठेवील, अशी राजसत्ताही उरली नव्हती आणि ख्रिस्ती ‘रिलिजन’ऐवजी प्राचीन पेगन प्रथांचे पालन करणार्यांचे संरक्षणही केले जात नव्हते. स्वाभाविकपणे राजघराण्यांच्या बरोबरीने युरोपात एक नवी सत्ता उभी राहिली ती म्हणजे, चर्च आणि त्याच्या प्रिस्टांच्या रचनाबद्ध संघटनेची. राजसत्तेबरोबरच सामान्य लोकांवर या ‘रिलिजन’च्या सत्तेचाही मोठा पगडा इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकात बसलेला होता. एक प्रकारे या सामाजिक रचनेस ख्रिस्ती ‘रिलिजन’चा सत्तेशी असलेला सैद्धांतिक संबंध कारणीभूत ठरला, असे म्हणता येईल. ख्रिस्ती संकल्पनेनुसार ईश्वर हा इहलोक आणि परलोक दोन्हीचा राजा आहे. परलोकात जरी तो प्रत्यक्ष राजा असला, तरी इहलोकात हे राज्य मानवी राजांमार्फत चालवले जाते. मात्र, या संकल्पनेचा अन्वयार्थ असा की, कोणताही राजा जरी गादीवर असला, तरी तो केवळ ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवत आहे. त्याची स्वतःची इच्छा कारभारात महत्त्वाची नाही. पण, मग ईश्वरी इच्छा नेमकी काय, याचा निवाडा कोण करणार? स्वाभाविकपणे स्थानिक पातळीवर स्थानिक प्रिस्ट आणि सर्वोच्च पातळीवर पोप यांना ईश्वरीय राज्याचे दूत म्हणून समाजात विशिष्ट मान निर्माण झाला. ख्रिस्ती किंवा सर्वच ‘अब्राहमिक रिलिजन’ हे अन्योन्य संबंधाने राज्यव्यवस्थेशी अशा प्रकारे जोडले गेलेले आहेत. या तत्त्वाचा प्रत्यक्ष आविष्कार म्हणून रोम शहराच्या अंतर्गत स्थापन झालेले व्हॅटिकन सिटी हे राज्य आपण पाहू शकतो. या प्रकारच्या शासनव्यवस्थेस ‘थिओक्रसी’ किंवा ‘पापल स्टेट’ म्हणजेच ‘पोपचे राज्य’ म्हटले जाते. याच राज-अधिकाराच्या आधारे चर्चने स्पेन आणि पोर्तुगालला अनुक्रमे पश्चिम आणि पूर्वेचे प्रदेश बहाल केले. आज अमेरिकेतील स्पॅनिश प्रभाव आणि आग्नेय आशियाबरोबर भारतातील गोव्यासारख्या प्रांतावर पोर्तुगीज प्रभाव याच वाटणीमुळे झालेला आपल्याला दिसतो; तो चर्चने वापरलेल्या याच संपूर्ण जगावर राज्य करण्याच्या अधिकारामुळे!
एकहाती अधिकार एकवटलेल्या कोणत्याही व्यवस्थेत घडते, तसेच ख्रिस्ती ‘रिलिजन’च्या व्यवस्थेतही कालपरत्वे हीण शिरले. चर्चचा सामान्य जीवनावर प्रभाव इतका वाढला की, चर्चचे कार्य नेमके काय, याविषयी जनतेतून तसेच प्रिस्टवर्गातूनही असंतोष व्यक्त होऊ लागला. या असंतोषाचे अंतिम स्वरूप प्रोटेस्टंट पंथाच्या स्थापनेत झाले. ख्रिस्ती धर्माच्या या पंथाने ईश्वरी संदेशाच्या प्राप्तीसाठी पोपच्या माध्यमाची आवश्यकता नाकारली. बायबलचे स्थानिक युरोपियन भाषांमध्ये भाषांतर आणि सोळाव्या शतकात लागलेला छपाईयंत्राचा शोध, यांमुळे बायबलचा संदेश सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे सुलभ झाले. मार्टिन ल्यूथरच्या ९५ घोषणांनी प्रोटेस्टंट पंथाची स्थापना झाली आणि इंग्लंडच्या राजाने दिलेल्या पाठिंब्याने त्यास राजमान्यताही मिळाली. ख्रिस्ती ‘रिलिजन’ला या काळात भेडसावणारा एक महत्त्वाचा तात्त्विक प्रश्न हा ख्रिस्त आणि ईश्वर यांच्यातील संबंधाचा होता. अन्य संस्कृतींच्या परिचयातून ख्रिस्ती ‘रिलिजन’च्या वैश्विकतेची युरोपात चर्चा सुरू झाली होती. जगभरात पुजल्या जाणार्या विविध देवता आणि ख्रिस्ती देव यांच्यातील संबंध एकत्वाचा की भिन्नत्वाचा? ईश्वरीय तत्त्वाची अनुभूती मानवास होऊ शकते का? अशा प्रश्नांची विविध उत्तरे शोधणे या काळात सुरू झाले होते. या अनुभूतीकरिता ख्रिस्ताच्या संदेशाचे महत्त्व काय, हा प्रश्न उद्भवणे स्वाभाविक होते. प्रोटेस्टंट पंथ हे या प्रश्नाचे एक उत्तर होते.
याच प्रश्नाचे अतिशय भिन्न उत्तर हे साधारण याच काळात निर्माण झालेल्या पुनरुज्जीवन चळवळीमधून दिले गेले. हे पुनरुज्जीवन युरोपच्या ग्रीकोरोमन इतिहासाचे आणि संस्कृतीचे होते. ख्रिस्ती ‘रिलिजन’च्या पारंपरिक मांडणीच्या उलट अशी ईश्वरवादाची मांडणी या काळात ग्रीक तत्त्वज्ञांच्या आधाराने केली जाऊ लागली. सुरुवातीच्या काळात हे पुनरुज्जीवन कला (चित्र व शिल्पकला) आणि विज्ञान (खगोल व भौतिकशास्त्र) यापुरते मर्यादित होते. परंतु, ख्रिस्ती ‘रिलिजन’ची सृष्टीच्या उत्पत्तीविषयीची तत्त्वे तसेच, नीती व सौंदर्यशास्त्राची तत्त्वे यांना पुनरुज्जीवन काळाच्या प्रणेत्यांनी आव्हान देण्यास सुरुवात केली होती. त्याचबरोबर ख्रिस्ती ‘रिलिजन’विषयक तत्त्वज्ञान (थिऑलॉजी) वापरून या नवमताची चिकित्सा कशी करावी, याचाही पुनर्विचार सुरू झाला होता. पुनरुज्जीवन चळवळीतून सुरू झालेल्या कला व विज्ञानविषयक नवीन विचारांचा कळसाध्याय प्रबोधन चळवळीच्या तत्त्वज्ञान विचारांतून लिहिला गेला. ईश्वरतत्त्वाची वस्तुनिष्ठ चिकित्सा करताना ईश्वरतत्त्व नाकारण्यापर्यंतची पायरी या तत्त्वज्ञानाने गाठली. विज्ञानाच्या सुयोग्य आकलनातून विश्वनिर्मितीच्या मागची तत्त्वे, त्याकरिता आवश्यक अशा गणिताच्या आकलनासह युरोपीय विचारवंतांच्या ध्यानात आल्याने, सुनियोजित विश्वाकरिता आधारभूत अशा ख्रिस्ती ‘थिऑलॉजी’मधील ईश्वराची गरज नाही, असे त्यांना वाटू लागले. या धारणेतूनच लाप्लासच्या प्रसिद्ध ‘गणिताला ईश्वर गृहीतकाची गरज नाही’ विधानाचा जन्म झाला. तर्कप्रज्ञेच्या आधारे ईश्वरतत्त्वाचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नातून अस्तिवाद, नास्तिवाद, अज्ञेयवाद यांसारख्या विविध प्रणालींचा उदय झाला. फ्रेंच राज्यक्रांतीसारख्या घटनांनी या ‘सेयुलॅरिझम’ तत्त्वाला प्रतिष्ठा मिळवून दिली. रोमन साम्राज्याविरुद्ध बंड करताना ‘राजाचे देणे राजाला द्या आणि देवाचे देवाला’ अशी घोषणा ख्रिस्ताने केलेली होती. ख्रिस्तानंतर १७०० वर्षांनी हीच घोषणा सेयुलर विचारवंतांनी उलट्या अर्थाने केली.
‘सेयुलॅरिझम’ संकल्पनेचा उदय हा अशा प्रकारे ख्रिस्ती ‘थिऑलॉजी’च्या पार्श्वभूमीवर झालेला आहे. ख्रिस्ती ‘थिऑलॉजी’मधील ईश्वर हा सर्वज्ञानी, सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान आहे. विश्वाचा निर्माता आणि नियंताही तोच आहे. स्वयंप्रेरणेतून कोणतेही मानवी कार्य (ज्याला आपण भारतीय आपले ‘क्रियमाण कर्म’ म्हणतो) ते शय आहे का, हा ‘थिऑलॉजी’मधील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ‘सेयुलॅरिझम’ तत्त्वाचा दुसरा आधार हा नीतितत्त्वांच्या निश्चितीचे आधारभूत तत्त्व कोणते, हा प्रश्न आहे. जगभरात ‘इन्क्विझिशन’च्या नावाखाली केले गेलेले अत्याचार हे नीतीपूर्ण समजले जाऊ शकतात का, याचे चर्चचे तत्कालीन उत्तर ‘होय’ असे होते. ख्रिस्ती मतानुसार ईश्वरतत्त्वात नीतिमत्तेचे मूळ शोधण्याऐवजी मानवी मूलप्रेरणांच्या अभ्यासातून अशी आधारभूत तत्त्वे शोधण्याचा प्रयत्न ‘सेयुलॅरिझम’ प्रणालीत केला गेला. ‘सेयुलॅरिझम’ची ही ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिल्यास आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो की, ख्रिस्ती ईश्वरतत्त्वाच्या अभावात ‘सेयुलॅरिझम’ तत्त्वाचीही आवश्यकता समाजात असत नाही. प्रबोधन चळवळीचे ईश्वराच्या नास्तित्वाचे आणि त्याला पुनःप्रत्युत्तर म्हणून चर्चकडून केले गेलेले ईश्वराच्या अस्तित्वाचे तर्क, हे मुळात एका ख्रिस्ती किंवा ‘अब्राहमिक रिलिजन’च्या चौकटीत केले गेलेले आहेत. या चौकटींच्या बाहेर त्यांना काहीही अर्थ नाही.
भारतीय समाजाच्या चार संकल्पनांचा विचार ‘सेयुलॅरिझम’ तत्त्वाचे निरुपयोगित्व आपल्याला दाखवून देतो. त्या संकल्पना म्हणजे धर्म, कर्मसिद्धांत, आत्मतत्त्व किंवा पुरुषतत्त्व आणि निर्गुण ईश्वरतत्त्व. या चारही तत्त्वांचा एकत्रित विचार केल्यास आपल्याला असे लक्षात येते की, हिंदूंच्या पारमार्थिक विचारातही ऐहिकता आहे आणि सामान्य ऐहिक व्यवहारात पारमार्थिक चिंतन. त्यामुळे ईश्वरतत्त्वविषयक हिंदू चिंतनात एक स्वाभाविक विवेक आहे. आपली नीतितत्त्वे मुळातच धर्म आणि व्यक्तीच्या कर्मांवर आधारित असल्याने ईश्वरतत्त्वाची आवश्यकता आपल्याला नीतिशास्त्राचा आधार म्हणून असत नाही. दुसर्या बाजूने प्रकृती तत्त्वाचे अस्तित्व स्वतंत्र की, ती ईश्वराची माया यांवर मतभेद असले, तरी तिच्या नियमनाची आवश्यकता नसल्याने ईश्वराकडे तेही काम आपण देत नाही. मुळातच जीव (केवळ मानव नाही) आणि ईश्वर यांच्या संबंधांची ‘हिंदू’ संकल्पना ‘अब्राहमिक’ संकल्पनेहून इतकी भिन्न आहे की, ईश्वराच्या अस्तित्वाविषयी आणि स्वरूपाविषयी कोणते एकमत होईल, अशा प्रकारची चर्चाच आपल्याला अशय वाटते. तर्कास अगम्य अशा विषयावर शाब्दिक चर्चा करणे म्हणजे, उजाड जमिनीवर बीज रुजवण्यासारखे असल्याने आणि ऐहिक जीवनात मुळात ‘ईश्वरनिरपेक्ष’ अशा धर्मसंकल्पनेने नियमनाची जबाबदारी घेतल्याने ‘सेयुलॅरिझम’ हे तत्त्व भारतीय मनास अगदीच परके ठरते.
भारतीय राज्यघटनेत ‘सेयुलर’ शब्द आणीबाणीच्या काळात घुसडला गेल्याचे आज सर्वांना माहीत असेलच. या कृत्याचा विरोध करताना अनेकदा असे म्हटले जाते की, भारतीय समाज अनादिकाळापासून मुळात सहिष्णू आहे. त्यामुळे आम्हाला वेगळे ‘सेयुलर’ म्हणायची गरज नाही. परंतु, ‘सहिष्णुता’ आणि ‘सेयुलॅरिझम’ ही अतिशय वेगळी तत्त्वे आहेत, हे अशी कोणतीही मांडणी करताना ध्यानात घ्यायला हवे. आमच्या संस्कृतीच्या एकात्म मांडणीचा मूलाधार धर्म असल्याने आमच्याकडे ‘थिओक्रसी’ ही संकल्पना नाही आणि त्याचमुळे आम्हाला ‘सेयुलॅरिझम’चीही आवश्यकता नाही. भारतीय संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यात भारत हा सेयुलर देश आहे का, या प्रश्नालाच काही अर्थ उरत नसल्याने त्याचे उत्तरही देणे शय नाही आणि तसा प्रयत्न करणे, हे आपण वसाहतवादी चौकटीतून विचार करणे न सोडल्याचे लक्षण असेल. ‘सेयुलॅरिझम’ हे ‘ख्रिस्ती रिलिजन’चे प्रत्युत्तर असल्याने या तत्त्वाचे समाजातील अस्तित्व असणे किंवा नसणे भारताच्या दृष्टीने निरर्थक चिंतन आहे, अशी स्पष्ट उद्घोषणा वैचारिक स्वातंत्र्याचे द्योतक आहे.
डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
९७६९९२३९७३