आविष्कार की संस्कार?

20 Aug 2025 12:18:09

बाळाला जन्म देणे हा एका आईच्या आयुष्यातील सर्वांत अद्वितीय आणि भावनिक अनुभव असतो. गर्भधारणेच्या क्षणापासून ते बाळाच्या पहिल्या रडण्यापर्यंतची ही वाटचाल आईसाठी आनंद, आशा, प्रेम आणि वेदना यांचा संगम. आईच्या पोटात वाढणार्‍या बाळाची प्रत्येक हालचाल, प्रत्येक ठोका, प्रत्येक स्पर्श तिच्या आत्म्याला स्पर्शून जात असतो. ती बाळाला पाहण्याची, मिठीत घेण्याची स्वप्ने पाहते आणि तेच तिच्या सहनशक्तीचे बळ ठरते.

थोडयात सांगायचे, तर बाळाला जन्म देणे म्हणजे आईच्या डोळ्यांतून ओघळणारा आनंदाश्रू, हृदयात उसळणारे निस्वार्थ प्रेम आणि आत्म्याला मिळणारी एक विलक्षण पूर्ती असते. म्हणूनच तर मातृत्व हे एक वरदान मानले जाते. पण, आता विज्ञान एवढ्या प्रगतीच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे की, येत्या काळात बाळाच्या जन्मासाठी स्त्रीच्या गर्भाशयाची गरजच भासणार नाही, असे काहीसे चित्र आता तयार झाले आहे. होय, कारण आता ही जबाबदारी चक्क एक रोबोट पार पाडणार आहे. ऐकायला जरी हे अगदी विचित्र आणि तितकेच अजब वाटत असले, तरी सत्य हेच की, येत्या काळात चीन या दिशेने झपाट्याने तयारी करत आहे आणि लवकरच तिथे माणसांऐवजी रोबोटच्या मदतीने कदाचित बाळ जन्माला येऊ शकते.

आज विज्ञान इतके पुढारले आहे की, बाळाला जन्म देण्यासाठी आईच्या गर्भाशयाची गरजच उरणार नाही, असे भविष्य आपल्या दाराशी येऊन उभे ठाकले आहे. चीनमधील ‘कैवा टेक्नोलॉजी’चे संस्थापक डॉ. झांग किफेंग यांनी नुकतेच ‘वर्ल्ड रोबोट कॉन्फरन्स’मध्ये सांगितले की, "ते ‘ह्यूमनॉईड प्रेग्नन्सी रोबोट’ तयार करत आहेत, ज्यामध्ये कृत्रिम गर्भाशय असेल. या रोबोटच्या गर्भाशयात अगदी आईच्या पोटी होणार्‍या बाळासारखेच बाळ वाढेल. त्यासाठी कृत्रिम अ‍ॅम्नियोटिक फ्लूईड आणि पोषणद्रव्यांची खास व्यवस्था असेल, जी गर्भधारणेपासून बाळ जन्मेपर्यंत त्याच्या वाढीला मदत करेल.” २०२६ साली या तंत्रज्ञानाचा पहिला नमुना (प्रोटोटाईप) बाजारात येणार असून, त्याची किंमत सुमारे १२ लाख रुपये असणार आहे. यामुळे सरोगेसीपेक्षा खूप कमी खर्चात आणि कायदेशीर अडचणींशिवाय बाळ जन्माला येऊ शकेल. ही संधी नैसर्गिकरित्या गर्भधारणा न करू शकणार्‍या लाखो जोडप्यांसाठी आशेचा किरण ठरू शकते, हे मात्र खरेच आहे. विशेष म्हणजे, हे तंत्रज्ञान वंध्यत्वासारख्या गंभीर समस्येवर एक मोठे उत्तर ठरू शकते आणि प्रजननाशी संबंधित अनेक अडचणींवर मात करून लाखो लोकांच्या आयुष्यात पालकत्वाचा आनंद घेण्याचे स्वप्न साकार करू शकते, अशीदेखील एक भावना व्यक्त होताना दिसते आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा जरी आविष्कार असला, तरी मातृत्वाच्या दृष्टिकोनातून हा तितकाच गंभीर विषय आहे. कारण, भारतीय संस्कृतीनुसार गर्भसंस्कार म्हणजे आईच्या विचारांचा, भावना, आहार आणि जीवनशैलीचा परिणाम बाळावर होतो. आई जे ऐकते, बोलते, वागते त्याचा थेट प्रभाव बाळाच्या मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासावर पडतो. त्यामुळे गर्भाशय हे फक्त जैविक वाढीसाठी नाही, तर संस्कारांच्या पाळण्यातल्या पहिल्या शाळेसारखे असते. ‘ह्यूमनॉईड प्रेग्नन्सी रोबोट’मध्ये बाळाची शारीरिक वाढ एकवेळ विज्ञानाच्या मदतीने व्यवस्थित होऊ शकेलही; परंतु त्या काळात बाळाला मिळणारा मानसिक, सांस्कृतिक, संवेदनशील स्पर्श ते कृत्रिम गर्भाशय कधीच देऊ शकणार नाही. म्हणजे विज्ञान बाळ जन्माला घालू शकते. पण, आईच्या गर्भातले संस्कार आणि भावनिक नाते हे तंत्रज्ञानाने निर्माण करता येणे सर्वस्वी अवघडच!

कदाचित भविष्यकाळात संशोधक बाळावर ध्वनी, प्रकाश, वाचन, संगीत अशा माध्यमांतून कृत्रिम गर्भात काही ‘संस्कार’ आयते पेरण्याचाही प्रयत्न करतील. पण, आईच्या अंतःकरणातून येणारा प्रेमस्पर्श, ममत्वभाव हा कुठल्याही तंत्रज्ञानाने कधीही नक्कल करता येणारा नाही, हे देखील समजून घ्यायला हवे. बाळाचे शरीर जरी विज्ञान घडवू शकत असले, तरी मन आणि आत्मा मात्र आईच घडवते. चीनचा हा प्रयोग विज्ञानाचा चमत्कार असला, तरी भविष्यात मानवी समाजासाठी एक मोठा कौटुंबिक, सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकीकडे अकल्पित प्रगतीचा स्वीकार करताना, दुसरीकडे संस्कार आणि संस्कृतीची वीण कायमची उसवली जाणार नाही, याची काळजी घेणे, हेच खरे मानवजातीसमोरील आव्हान!
Powered By Sangraha 9.0