बेस्ट निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "या छोट्या निवडणुका..."

20 Aug 2025 13:49:53

मुंबई : (Sanjay Raut on Best Election Result) मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'च्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या नेतृत्वातील उत्कृष्ट पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे. यासह बेस्ट पतपेढीतील ९ वर्षांची सत्ता ठाकरे गटाने गमावली आहे. याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता खासदार संजय राऊत यांनी आपल्याला निकालाची माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली.

स्थानिक स्तरावरील छोटी निवडणूक

पराभवावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, “बेस्टच्या पतपेढीच्या निकालावर कोण जिंकलं? याची माझ्याकडे खरोखर माहिती नाही. मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही. मी या विषयाकडे फार लक्ष दिलं नाही. या पतपेढ्यांच्या निवडणुका ट्रेड युनिअनच्या ताकदीवर अवलंबून असतात. माझ्याकडे काय झालं याची पूर्ण माहिती नाही. मी माहिती घेऊन बोलेन. स्थानिक स्तरावरील छोटी निवडणूक आहे ती, मला यावर तुम्ही दिल्लीत विचारत आहात", असे यावेळी राऊतांनी म्हटलं आहे.

ठाकरे ब्रँड फेल झाल्याच्या टीकेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की,“पतपेढ्यांच्या निवडणुका या ट्रेड युनियनच्या असतात. तिथे कोणती युनियन मजबूत त्यावर हे अवलंबून असतं. त्यामुळे ठाकरे ब्रँड कधीही संपणार नाही. ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही. पतपेढीची निवडणूक म्हणजे परीक्षा नाही. चाचणी परीक्षा नाही. ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात, तिथे बऱ्याच काळापासून शरद राव याची युनियन आहे. त्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त होती. या निवडणुका पक्षीय बळावर लढल्या जात नाहीत. फार मोठं यश कोणाला मिळालंय असं मला वाटत नाही." मुंबईत ज्यांनी निवडणूक लढवली त्यांना हा प्रश्न विचारायला हवा असेही त्यांनी म्हटले आहे.




Powered By Sangraha 9.0