अभिजात मराठी भाषा सप्ताहात ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

20 Aug 2025 15:44:58

मुंबई : महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ तर ३ ते ९ ऑक्टोबर हा सप्ताह ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. या निमित्ताने मराठी भाषा विभागातर्फे “मराठी भाषा दूत” ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा जगभरातील १८ ते २१ वयोगटातील मराठी बोलणाऱ्या युवकांसाठी खुली असेल. “अभिजात मराठी – माझ्या अपेक्षा” या विषयावर प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. स्पर्धेचे संयोजन ऑगस्ट मीडिया या संस्थेतर्फे केले जाईल.

स्पर्धा ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून, महाराष्ट्रातील विविध महसूल विभाग तसेच बृहन्महाराष्ट्र मिळून प्रथम नोंदणी करणाऱ्या १००० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल.

या स्पर्धेतून उत्तम १०० स्पर्धकांची निवड “मराठी भाषा दूत” म्हणून केली जाणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना मराठी भाषा विभागातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

नोंदणीसाठी गुगल फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांनी https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले आहे.


Powered By Sangraha 9.0