"महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडला नाही तर हिंदुत्वाच्या स्टँडला स्थान आहे"; बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर नवनाथ बन यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

20 Aug 2025 13:05:25

मुंबई : (Navnath Ban On BEST Elections) राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'ची निवडणूक सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पार पडली. या निवडणूकीत मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन लढवलेल्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळवता आलेली नाही. या पराभवामुळे ठाकरे गटाने बेस्ट पतपेढीतील तब्बल ९ वर्षांची सत्ता गमावली आहे. दुसरीकडे भाजप आणि शशांक राव यांच्या नेतृत्वातील पॅनलने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी भाजपच्या प्रदेश अध्यक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली.

संजय राऊतांची दातखिळी बसलीय का?

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच नवनाथ बन म्हणाले की, "गेल्या ९ वर्षांपासून मुंबईतील बेस्टवर ज्यांचं वर्चस्व होतं ते अखेर संपुष्टात आले आहे. भाजप आणि शशांक राव यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. महत्त्वची गोष्ट म्हणजे समोरच्या पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही. सर्वसामन्य मुंबईकर हा भाजपच्या नेतृत्वाबरोबर आहे हे पुन्हा सिद्ध झाले. विश्वप्रवक्ते संजय राऊत यांची पत्रकार परिषद ऐकली. त्यावेळी ते असे म्हणाले की, मला याविषयी कल्पना नाही. खरंतर चार दिवसांपूर्वी संजय राऊत याच मुद्द्यावर पोपटपंची करत होते, भरभरुन बोलत होते. आता मात्र त्यांची दातखिळी बसली आहे का, ते मूग गिळून गप्प बसलेत का, असा माझा प्रश्न आहे.

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडला नाही तर हिंदुत्वाच्या स्टँडला स्थान आहे

आता त्यांच्याकडे बोलायला ईव्हीएमचा मुद्दा नाहीये, मतचोरीचा, षडयंत्राचा मुद्दा नाहीये आणि आता बॅलेट पेपरवर मुंबईकरांनी ही निवडणूक भाजपच्या माध्यमातून विजयी केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे बंधूंचा टायर या निवडणूकीत पंक्चर झाला आहे. यापुढे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा ब्रँड चालणार आहे. आणि ठाकरे ब्रँड पंक्चर होणार आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडला नाही तर हिंदुत्वाच्या स्टँडला स्थान आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. यापुढे मुंबईमध्ये जो कुणी हिंदुत्वाचा स्टँड घेणार तोच विजयी होणार, हे या निवडणूकीने दाखवून दिले.




Powered By Sangraha 9.0