श्रीराम मंदिर परिसरात माकडे व पक्ष्यांनाही मिळणार आश्रयस्थान - दहा एकर पंचवटीत होणार निवारा

20 Aug 2025 17:57:50

मुंबई  : अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरात येणाऱ्या माकडांना व पक्ष्यांना सुद्धा पुरेशी व सुरक्षित जागा दिली जाणार असून त्यासाठी मोठा जलाशयही असेल. एवढेच नव्हे तर एकूण सत्तर एकरांपैकी पन्नास एकर क्षेत्र मुक्ताकाश (ओपन टू स्काय) असेल. येथे रस्ते, पुष्करणी/जलाशय असू शकतात. त्यापैकी तीस एकर क्षेत्र हरिताई व मातीचे असणार आहे. बांधकाम समितीच्या दुसऱ्या दिवसाच्या बैठकीनंतर तीर्थक्षेत्राचे महामंत्री चंपत राय यांनी कारसेवकपुरम येथे पत्रकारांशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली.

चंपत राय यावेळी म्हणाले, ऑक्टोबरपर्यंत दोन उत्तर दिशेला आणि एक पश्चिमेला अशा तीन लिफ्ट्स, तसेच शेषावतारसह परकोट्यातील मंदिरांमध्ये दर्शन सुरू होईल. तसेच परकोट्याच्या आग्नेय कोपऱ्याबाहेर एक मोठे चप्पला ठेवण्यासाठी दालन तयार झाले असून, दररोज एक लाख भाविक त्याचा उपयोग करू शकतील. दहा एकरांमध्ये पंचवटी विकसित करण्यात येईल, ज्यात जलाशयासह पक्षी आणि माकडांसाठी निवारा असेल.

आयआयटी मद्रास अत्याधुनिक गॅलरी (वीथिका) उभारणार असून दिल्लीतील एक तज्ज्ञ संस्था संग्रहालयाचा तांत्रिक भाग विकसित करणार आहे. चंपत राय यांनी सांगितले की बांधकाम समितीची पुढील बैठक ७ ते ९ सप्टेंबर प्रस्तावित असून, ट्रस्टची बैठकही ९ सप्टेंबरला होईल. त्यांनी स्पष्ट केले की नोव्हेंबरमधील ध्वजारोहण हे प्राणप्रतिष्ठेची पुनरावृत्ती नाही. यावेळी अयोध्या व आसपासच्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0