'पत' आणि 'पेढी'साठी लढणाऱ्यांच्या हाती भोपळा मंत्री आशिष शेलार ; महापालिकेत स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या नावांची घोषणा

20 Aug 2025 18:17:36

मुंबई : कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि 'पत' आणि 'पेढी'साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीच्या निकालावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्याबाजूने आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आम्ही पक्ष म्हणून लढलो नाही पण आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव विजयी झाले. हा तर मोठा शुभसंकेत आहे. बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्यावर हा विजय आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे तमाम तथाकथित राजकीय विश्लेषक, मतचोरी झाले म्हणणारे तथाकथित तज्ञ आणि विश्वविख्यात प्रवक्त्यांपासून गल्लोगल्लीतल्या निर्भय वक्त्यांपर्यंत सगळे उघडे, नागडे झाले आहेत. भर पावसात तोंडावर आपटले आहेत. मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची," असे ते म्हणाले.

त्यानंतर पुण्यात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "आता भूमिका स्पष्ट झाली आहे. भाजप पक्ष म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरलो नव्हतो. ही निवडणूक कामगारांची आणि बेस्टवर प्रेम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती. उबाठा आणि मनसेने याचे राजकीयकरण केले. प्रत्येक गोष्टीचे राजकीयकरण्याचेच फळ त्यांना मिळाले आणि हाती भोपळा आला. तुम्ही एकत्र या किंवा वेगळे लढा. शून्य अधिक शून्य बरोबर शून्यच हे मी आधीही म्हणालो होतो. आज भोपळा हातात आला. मुंबईचा, मुंबईकरांचा, मराठीचा, कामगारांचा आणि भाजपचा विजय झाला. मुंबई महानगरपालिकेच्या स्टार प्रचारकांची मोठी यादी जाहीर होईलच. पण स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे नाव मी आज मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून मी घोषित करतो. या दोघांनीच बेस्टच्या निवडणुकीत दोन्ही भावांच्या पक्षाला मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे हे दाखवले आहे. त्यामुळे शोलेत जसे होते तसे मुंबई भाजपच्या निवडणुकीत सर्व नेते असतीलच. पण जय-विरू म्हणून मी शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे नाव घोषित करतो. आधी या दोघांशी निपटा आणि मग माझा आणि देवेंद्रजींचा विचार करा," असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0