उमरावी उन्माद...

20 Aug 2025 22:15:05

ब्रिटन असो भारत अथवा अन्य कुठलाही देश, प्रारंभीपासूनच राजघराण्यांविषयी सामान्यांच्या मनात प्रचंड कुतूहल. राजघराण्यातील सदस्यांचा ऐषोरामी थाट, त्यांची लखलखणार्या सोन्यापासून ते उंची गाड्यांपर्यंतची आलिशान जीवनशैली आणि जगावेगळे श्रीमंतीचे शौक, हे कायमच लोकचर्चेच्या आणि माध्यमांच्याही केंद्रस्थानी असतात. आज ही राजघराणी बहुतांशी नामधारी सत्ताकेंद्र असली तरी, त्यांचे राजकारणातील, समाजातील स्थान हे अबाधित आहेच. पण, जेव्हा राजघराण्यातील सदस्यांवर गंभीर आरोपांचे शिंतोडे उडतात, तेव्हा त्यांची प्रतिष्ठा, समाजातील मानमरातबही धुळीस मिळायला फारसा वेळ लागत नाही. सध्या नॉर्वेच्या राजघराण्यातील युवराजाच्या अशाच उमरावी उन्मादामुळे अन्य शाही सदस्यांची मानही शरमेने झुकली आहे.

नॉर्वेच्या राजघराण्याची राणी मेट्टे मॅरिट यांचा २८ वर्षीय सुपुत्र मारियस बोर्ग होईबी. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये मारियसवर बलात्कार, घरगुती हिंसाचार यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आणि त्याला अटकही झाली. या प्रकरणी खटला सुरूच होता आणि नुकताच मारियसवर ३२ गंभीर गुन्हे, ज्यामध्ये चारवेळा बलात्कार, घरगुती हिंसाचार, मारहाण आणि अन्य गुन्ह्यांचाही समावेश आहे. या खटल्याची सुनावणी पुढील वर्षाच्या प्रारंभी होणार असली, तरी या गुन्ह्यांमध्ये आरोप सिद्ध झाल्यास मारियसला तब्बल दहा वर्षांचा कारावास होऊ शकतो. या सगळ्या प्रकरणी प्रारंभीपासूनच नॉर्वेच्या राजघराण्याने मौन बाळगले असले तरी, देशाची तपासयंत्रणा, न्याययंत्रणा मात्र या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करताना दिसते. खरं तर मारियस हा राणी मेट्टे मेरिट यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीपासून झालेला मुलगा. त्यामुळे साहजिकच नॉर्वेच्या राजघराण्यातील तो अर्थोअर्थी वारसदारही नाही. त्याचे वास्तव्यसुद्धा राजमहालापासून जवळच असलेल्या बंगल्यातच होते. पण, शेवटी रक्त राणीचेच. त्यामुळे हे प्रकरण साहजिकच गंभीर ठरावे.

पैसा आणि प्रतिष्ठेच्या जोरावर आपण स्वैराचार माजवू शकतो, याच सत्तांध धुंदीत मारियसही वावरत होता. राजघराण्याचे थेट सदस्य नसलो, तरी ‘जानता हैं मेरा बाप कौन हैं’ प्रमाणे ‘मेरा रानी माँ’ अशा फुशारक्या मारणारे हे लाडसाहेब! राणीसाहेबांच्या याच पुत्रप्रेमापोटी आणि मुक्त स्वातंत्र्याच्या नशेत, मारियसने एक, दोन नव्हे, तर चार मुलींची अब्रू लुटली. काहींवर तर त्या त्या झोपलेल्या असताना, प्रतिकार करण्याच्या अवस्थेतही नसताना, मारियसने आपला डाव साधला. यापैकी एक तर त्याचीच प्रेयसी होती. तिला कोकेन आणि दारूच्या नशेखाली जीवघेणी मारहाण केली. मग अटक झाल्यानंतर आपल्याला मानसिक स्वास्थ्यासाठी उपचार घ्यायची गरज असल्याची कबुलीही खुद्द मारियसने दिली खरी, पण शेवटी खुन्शी वृत्तीचा पाशवी पुरुषच तो! हे सगळे कमी काय म्हणून, त्याच्या मोबाईलमध्येही कित्येक मुलींची अश्लील छायाचित्रे, चित्रफितीही सापडल्या. तसेच, तोडफोड करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, परवान्याशिवाय वाहन चालविणे यांसारख्या गुन्ह्यांचाही ठपका मारियसवर ठेवण्यात आला.

नॉर्वेजियन राजघराण्यातील या एकूणच प्रकरणामुळे राजेशाहीच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. पण, राजेशाहीच्या बाबतीत घडलेले हे काही पहिलेवहिले प्रकरण नाहीच. ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रिन्सेस डायना यांच्या अपघाती गूढ मृत्यूपासून ते संयुक्त अरब अमिरातीच्या प्रिन्स सईद यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने त्यांच्यावर केलेल्या मारहाणीच्या आरोपांपर्यंत, जगभरातील राजघराण्यांवर अशाप्रकारे शरमेने मान खाली घालण्याचे कित्येक प्रसंग गुदरले. नुकतेच ब्रिटनच्याच राजघराण्याचे प्रिन्स अॅन्ड्रयु यांचे नावही कुप्रसिद्ध ‘एपेस्टाईन फाईल्स’मध्ये आल्याने, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप त्यांच्यावर झाले. परिणामी, शाही संरक्षणाचा त्यांना त्याग करावा लागला. खरं तर अशा घटनांमुळे आजही राजघराण्याला आदर्शवत मानणार्या सामान्यांची घोर निराशा आणि विश्वासघात होतो. शिवाय एका सदस्याच्या गैरकृत्यामुळे अख्ख्या राजघराण्यावरही बदनामीचा बट्टा लागतो. त्यामुळे राजघराण्यांनी समाजहित आणि नैतिकतेचा केवळ दिखावा न करता, त्यांच्या पुढील पिढ्यांच्या मूल्य-संस्कारांचाही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
Powered By Sangraha 9.0