मुंबई : मालेगाव ब्लास्ट प्रकरणात १७ वर्षांनी कोर्टाचा निकाल लागला आणि काँग्रेसची ‘भगवा दहशतवाद’ थियरी पूर्णपणे फेटाळली गेली. ३१ जुलै रोजी स्पेशल एनआयए कोर्टाने या प्रकरणातील सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले. यामध्ये माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश होता. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर व लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी जो छळ सहन केला, त्याविषयी अनेकांना ठाऊक आहेच. मात्र रमेश उपाध्याय आणि समीर कुलकर्णी यांनी सुद्धा एटीएसने कशा प्रकारे त्यांना खोट्या प्रकरणात अडकवले आणि हिंदू नेत्यांची नावे घेण्यासाठी अमानुष छळ केला, याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
खासगी अवयवांना विद्युत प्रवाहाचे झटके देणे, जबरदस्तीने मांस खायला लावणे, जानवे व धार्मिक ग्रंथांचा अपमान करणे आणि पत्नी-मुलीला नग्न करून बलात्काराची धमकी देणे असे अत्याचार त्यांच्यावर झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय म्हणाले होते की महाराष्ट्र एटीएसने त्यांना कोणतेही कारण नसताना पकडले आणि बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवले. त्यांना मारहाण करण्यात आली, गुप्तांगावर विद्युत प्रवाहाचे झटके देण्यात आले, पायांवर लाकूड ठेवून पोलीस उभे राहायचे. मानसिक छळ करण्यासाठी पत्नीला नग्न करण्याची, तर मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली जात होती. एटीएसचा दबाव होता की त्यांनी योगी आदित्यनाथ, प्रवीण तोगडिया, इंद्रेश कुमार आणि श्री श्री रविशंकर यांची नावे घ्यावीत आणि या नेत्यांनीच ब्लास्ट करण्याचे आदेश दिले असे खोटे विधान करावे.
त्याचबरोबर समीर कुलकर्णी यांनीही अशीच आपबीती सांगितली. पोलीस त्यांना रोज २०-२० तास मारहाण करत, ज्यामुळे त्यांचे तीन दात तुटले. शाकाहारी असूनही त्यांच्या तोंडात जबरदस्तीने मांस कोंबण्यात आले होते. एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्या समोर गीता, हनुमान चालीसा फाडली आणि त्यांचे जानवे काढून ते देखील पायाखाली तुडवण्यात आले होते. या सगळ्या अत्याचारांचा उद्देश एकच होता, त्यांच्याकडून मनासारखा जबाब उगाळून घेणे.