बच्चन फ्लॉप हिरो! ‘त्याला घेऊ नका’, कोणी केला होता अमिताभ यांचा अपमान?

20 Aug 2025 15:11:49

मुंबई : 'शोले' हा असा चित्रपट आहे जो अगदी लहानांपासून ते थोरांपर्यत अगदी सगळ्यांनाच ज्ञात आहे. याचवर्षी या सिनेमाने पन्नाशी गाठली. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते रमेश सिप्पी यांचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘शोले’ प्रदर्शित होऊन ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘शोले’ १९७५ मध्ये रिलीज झाला होता. जय-वीरू ही जोडी प्रचंड गाजली. याच चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी जयची भूमिका साकारली होती. तर वीरूच्या भूमिकेत अभिनेते धर्मेंद्र होते. चित्रपट सुपरहीट ठरला होता. पण अनेकांना माहिती नसेल, ‘शोले’ पूर्वी अमिताभ बच्चन यांचं करिअर फार यशस्वी नव्हतं, अमिताभ यांची फ्लॉप हिरो अशी ओळख बनू लागली होती. आणि त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी अमिताभ बच्चन यांना सिनेमात न घेण्याचा सल्ला रमेश सिप्पी यांना दिला होता.

रमेश सिप्पी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे, त्यात ते म्हणतात, “आम्ही 'सीता और गीता' (१९७२) हा सिनेमा हिट ठरल्याने घरी सक्सेस पार्टी करत होतो, त्या पार्टीला बरेच लोक आले होते. ते कुजबुजत होते आणि मला सल्ला देत होते की त्याला (अमिताभ बच्चन) घेऊ नका कारण, त्याआधी त्याचे अनेक फ्लॉप चित्रपट झाले होते. ते मला म्हणाले, ‘अशी चूक करू नकोस!’ अशी आठवण सिप्पी यांनी सांगितली. सल्ला देणारे लोक हे बॉक्स ऑफिसचे जाणकार होते आणि त्यांना चित्रपट कशी कामगिरी करेल, याबद्दल काळजी वाटत होती, असंही सिप्पी यांनी नमूद केलं.

तर पुढे ते सांगतात, “पण त्यांच्यात (अमिताभ बच्चनमध्ये) काहीतरी असं होतं जे मला चांगलं वाटलं होतं. त्यांचे काही चांगले चित्रपट होते, पण ते चालले नव्हते. १९७१ साली आलेल्या आनंदमध्ये राजेश खन्नांची भूमिका खूपच भावनिक होती आणि अमिताभ एका शांत व्यक्तीच्या भूमिकेत होते. पण जर त्या दोघांपैकी कोणीही एक त्या सिनेमात नसतं, तर तो चित्रपट चालला नसता असं मला वाटतं,” असं झूमशी बोलताना सिप्पी म्हणाले.

बच्चन हे शोलेसाठी योग्य आहेत असं सिप्पी यांना वाटत होतं. आणि त्यामुळेच अमिताभ यांच्यातील अभिनयाचं कसब ओळखून रमेश सिप्पींनी त्यांना संधी देऊ केली. “त्या काळात आणखी एक चित्रपट आला होता, 'बॉम्बे टू गोवा' (१९७२) या सिनेमात त्यांनी बसमध्ये एक गाणं गायलं होतं जे खूप चांगलं होतं. इतकी उंची असूनही त्यांच्या शरीराची हालचाल लयबद्ध होती,” अशी आठवण सिप्पी यांनी सांगितली.

“म्हणून जेव्हा मी हे दोन परस्परविरोधी पात्र आणि चित्रपट पाहिले तेव्हा मला वाटलं की या व्यक्तीत ही क्षमता आहे. तसेच माझ्याकडे सिनेमात आधीच अनेक यशस्वी स्टार होते, जसे की धर्मेंद्र जी (जय), संजीव कुमार (ठाकूर म्हणून), हेमा मालिनी (बसंती) आणि जया भादुरी (राधा). त्यामुळे मला त्यांना एक संधी द्यायची होती आणि माझा तो निर्णय योग्य ठरला,” असंही सिप्पी पुढे म्हणाले. अशा रितीने अमिताभ यांची शोलेमध्ये वर्णी लागली. चित्रपट हिट ठरला आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट सिनेमे केले. तर आज अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जातात.


Powered By Sangraha 9.0