प्रकाशातले तारे तुम्ही...

20 Aug 2025 22:35:18

स्वतः अंशतः अंध असूनही इतर अंध मुलांचे आयुष्य प्रकाशमान करणाऱ्या पोन्नलागर देवेंद्र यांच्याविषयी...

दृष्टी नसली, तरी दृष्टिहिनांची स्वप्ने मात्र मोठी असतात, त्यांच्या मनातली प्रकाशकिरणे कधीच मंदावत नाहीत. दृष्टिहीन किंवा मग अंशतः अंध मुले, ते आपल्या आयुष्यातील अंधाराशी झुंज देत असताना, ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वासाच्या उजेडात स्वतःला घडवत असतात. समाजात ही मुले पुढे केवळ स्वावलंबीच होत नाहीत, तर कला, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रांतही उल्लेखनीय कामगिरी करतात. त्यांच्या क्षमतांकडे केवळ करुणेच्या दृष्टीने नव्हे, तर प्रेरणेच्या दृष्टीने पाहणे हे आजच्या काळाचे मोठे उत्तरदायित्व आहे. आजच्या युवापिढीने पोन्नलागर देवेंद्र यांच्याकडे पाहून त्यांच्यातील गुण व आत्मविश्वास आपल्यामध्ये कसा आणता येईल, याचा नक्कीच विचार करावा, अशी या माणसाची गोष्ट आहे.

पोन्नलागर देवेंद्र यांचा जन्म शीव कोळीवाडा परिसरातील एका सरकारी रुग्णालयात झाला. वरळीच्या हॅपी होम स्कूल फॉर दी ब्लाईंड या शाळेत त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर पुढे रामनारायण रुईया महाविद्यालयातून त्यांनी आपले ‘बीए’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे, सोमय्या महाविद्यालयामधून योगशास्त्राचा अभ्यासदेखील त्यांनी पूर्ण केला. स्वतः अंशतः अंध असतानाही ते कधी खचले नाहीत आणि त्यांनी मोठ्या धैर्याने आपले शिक्षण पूर्ण केले. आई, वडील, भाऊ, बहीण, वहिनी, पुतण्या असा त्यांचा परिवार असून ते सदैव त्यांच्या पाठीशी आहेत.

पोन्नलागर ज्या शाळेत शिकत होते, त्या शाळेत पूर्ण अंधत्व असलेल्या मुलांची संख्या अधिक होती. त्यामुळे आपणही इतरांना मदत करू शकतो आणि ती नक्की करावी, असे संस्कार शाळेच्या मुख्याध्यापकांनी पद्मश्री मेहरबनर्जी यांनी नेहमी त्यांच्यावर केले. याच भावनेने त्यांना वाढवले. त्यांच्या प्रेरणेतून पुढे पोन्नलागर देवेंद्र यांनी २०१० साली ‘नयन फाऊंडेशन’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून पोन्नलागर हे दृष्टिहीन आणि अंशतः अंधत्व असलेल्या मुलांसाठी अविरतपणे काम करत आहेत. पोन्नलागर यांच्या योग शिक्षिका नीषा ठक्कर या आर्थिकदृष्ट्या खंबीरपणे तेव्हा पोन्नलागर यांच्या पाठीशी होत्या. त्याचबरोबर रुईयाच्या ‘एनएसएस’ विभागातील त्यांचे मित्र प्रल्हाद खांडगे, महेश नवले, सागर जोशी या सर्वांनी सुरुवातीच्या काळात त्यांना मोठी मदत केली होती.

‘स्नेहांकित हेल्पलाईन’ नावाची एक संस्था होती, जी मुलांना दरवर्षी गिर्यारोहणासाठी घेऊन जायची. मधल्या काळात दोन वर्षे तो उपक्रम खंडित झाला. त्यानंतर पोन्नलागर २०१० सालापासून ‘नयन फाऊंडेशन’ संस्थेमार्फत हा उपक्रम आपल्या हाती घेतला आणि अंध मुलांना गिर्यारोहणासाठी नेण्यास सुरुवात केली. साधे डोळे बंद करून चालणे सामान्यांना जमत नाही, तर ही अंध मुले चक्क गिर्यारोहण करत डोंगर सरसर चढतात, हे नवलच! कौतुकाची बाब म्हणजे, पोन्नलागर यांच्या नेतृत्वात मुलांनी कळसुबाई शिखरसुद्धा सर केले आहे. २०१० सालापासून एकूण १४ ट्रेक पूर्ण केली आहेत. माजी उपप्राचार्य मनीष हाटे यांचे कायम मार्गदर्शन त्यांना मिळत आले आहे.

आज ‘नयन फाऊंडेशन’च्या माध्यमातून वृक्षारोपण, समुद्रकिनार्यांची स्वच्छता असे अनेक उपक्रम राबविले जातात. ‘कोरोना’ काळातही लालबाग येथे आयोजित रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने ‘नयन फाऊंडेशन’च्या मुलांना सहभाग घेतला होता. क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास संस्थेमार्फत क्रिकेट, फुटबॉलसारखे विविध खेळ आयोजित केले जातात.

२०१४ सालापासून पोन्नलागर यांनी स्वतःचे गोविंदा पथकही तयार केले आहे, ज्याची दखल ‘युनेस्को’नेसुद्धा घेतली. हे महाराष्ट्रातले पहिले दृष्टिहीन गोविंदा पथक. यावर्षी त्यांनी पहिल्यांदाच पाच थर लावून त्यांनी विक्रम रचला. २०१९ सालापासून मुंबई, नाशिक, ठाणे, अलिबाग अशा विविध ठिकाणी २०० हून अधिक ठिकाणी थर लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या दहा-बारा वर्षांत एकदाही कुठल्या गोविंदाला इन्शुरन्सची गरज भासली नाही.

‘नयन फाऊंडेशन’मध्ये नव्याने येणार्यांना आपण संस्थेशी जोडल्याने वेगळे काहीतरी करत आहोत, याचा एक आनंद पोन्नलागर देवेंद्र यांना आहे. डोळस मुले जे करतात तसे आपणही करतो, याचा त्यांना अभिमान आहे. आज ही संस्था शाळा-महाविद्यालयातील परीक्षांसाठी रिडर-रायटर पुरवतात. जवळपास मुंबई १५० ते २०० जण विविध क्षेत्रांत काम करत आहेत. अंध म्हटल्यावर ही मुले काही करू शकत नाही असे वाटायचे, मात्र आता काळ बदलला आहे. सामान्यांच्या खांद्याला खांदे लावून ही मुले काम करत आहेत, याचा आनंद पोन्नलागर देवेंद्र यांना आहे. इतर संस्था जे करत नाही, ते आपण करावे, या तत्त्वावर संस्था आज चालते आहे. गेल्या दोन वर्षांपासून ‘आधारिका फाऊंडेशन’ या संस्थेच्या आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेते आहे. कुठल्याही व्यक्तीची अडचण सोडवणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पोन्नलागर कार्यरत आहेत. पोन्नलागर देवेंद्र पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0