नवी दिल्ली : (130th Constitutional Amendment Bill) सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी 130 व्या घटना दुरूस्तीचे विधेयक लोकसभेत मांडले. हे विधेयक मांडताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभेत विधेयक सादर करत असताना विरोधकांनी या विधेयकाच्या प्रती फाडून शाहांच्या दिशेने भिरकावल्या.त्यामुळे लोकसभेतील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं काय घडलं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी १३०व्या घटना दुरूस्तीचे विधेयक बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर केले. यावेळी विधेयक पटलावर मांडत असताना अमित शाहा बोलण्यासाठी उभे राहिले होते. ते प्रस्ताव वाचून दाखवत असतानाच विरोधकांनी मात्र आक्रमक पवित्रा घेत विधेयकाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याच विरोधात शाहांनी आपले विधेयक मांडणे थांबवले नाही. पुढे विरोधकांनी आपली घोषणाबाजी तशी सुरु ठेवत विधेयकाच्या प्रती फाडून थेट अमित शाह यांच्या दिशेने भिरकावले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. विरोधकांच्या या भूमिकेनंतर अमित शाह यांनी ही विधेयके संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली.
१३० व्या घटनादुरुस्ती विधेयकात काय आहे?
अमित शाह यांनी सादर केलेल्या १३० व्या घटना दुरुस्ती विधेयकाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या विधेयकानुसार, जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री यांना अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली, ज्यामुळे किमान ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि त्यांना सलग ३० दिवस कोठडीत ठेवले गेले, तर त्यांना ३१व्या दिवशी पदावरून हटवले जाईल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतरही राजीनामा दिला नाही आणि तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांनी ४२१ दिवस तुरुंगात राहिल्यानंतरही राजीनामा दिला नाही.