स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणणारे कुठे गेलेत? - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठा गटाला सवाल ; पृथ्वीराज चव्हाण यांना किंमत चुकवावी लागेल

    02-Aug-2025   
Total Views |

ठाणे : स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणणारे आता कुठे गेलेत? असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला केला आहे. शनिवार, २ ऑगस्ट रोजी त्यांनी ठाणे येथे माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. हिंदू धर्म आणि सनातन धर्म कधीही कुणावरही अन्याय करत नाही. तो सहिष्णू आहे. त्यामुळे हा हिंदूत्वाचा आणि सनातन धर्माचा अपमान असून याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. यावर हिंदूत्ववादी म्हणणारे आता कुठे गेले? एवढ्या मोठ्या घटनेवर ब्र शब्दही न काढणे हे कुठले हिंदूत्व आहे? आम्ही बाळासाहेबांचे हिंदूत्व पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे ज्यावेळी हिंदूत्वावर आणि भगव्यावर आरोप होतील त्यावेळी आरोप करणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल," असे ते म्हणाले.

भगव्याचा अपमान करणे हीच काँग्रेसची नीती

"मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहनजी भागवत साहेबांचे नाव घ्या याबाबत टॉर्चर केल्याचे एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने सांगणे ही दुर्दैवी बाब आहे. यासोबतच आज साध्वी प्रज्ञा यांनी पंतप्रधान मोदीजींचे नाव घेण्यासाठी त्यांना त्रास दिल्याचे सांगितले आहे. हिंदूत्वाचा आणि भगव्याचा अपमान करणे ही काँग्रेसची नीती आहे. मतांच्या राजकारणासाठी कुठल्या ते थराला जाऊ शकतात, याचे हे मुर्तीमंत उदाहरण आहे. तत्कालिन राज्यकर्ते म्हणायचे की, दहशतवादाला कुठलाही धर्म किंवा रंग नसतो. पण याच लोकांनी मालेगाव बॉम्बस्फोटात भगवा दहशतवाद असल्याचे सांगितले. हिंदूत्ववादी लोकांना यात जबरदस्तीने गोवण्यासाठी तपास यंत्रणेवर दबाव निर्माण केला, हे अतिशय दुर्दैवी आहे. सरसंघचालक मोहनजी भागवत, पंतप्रधान मोदीजी हे कट्टर देशभक्त, राष्ट्रभक्त आणि देशाला पुढे नेणारे लोक आहेत. त्यांच्यावर आरोप करून भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचे कारस्थान तत्कालिन काँग्रेस सरकारने रचले होते. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्माची माफी मागितली पाहिजे. त्यांची चौकशी झाली होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे," असेही ते म्हणाले.

राहुल गांधींना पोटदुखी

"राहुल गांधी नेहमीच सावरकरांचा आणि हिंदूत्वाचा अपमान करतात. आता त्यांनी ऑपरेशन सिंदुरचा आणि प्रधानमंत्र्यांचाही अपमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवल्याने त्यांना पोटदुखी सुरु झाली. राहुल गांधी वारंवार हिंदूत्वाचा अपमान करतात आणि त्यांचे साथीदार उबाठा हे निमूटपणे सहन करतात. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. मतांसाठी हिंदूत्व धरायचे आणि सोडायचे, असे त्यांचे सुरु असते. हा त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून जनता त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर देईल," असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.



अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....