आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल प्रकरणी दौंडमध्ये दोन गटांत हिंसक संघर्ष! ; सय्यद नावाचा तरुण पोलिसांच्या ताब्यात

02 Aug 2025 17:46:19

मुंबई : समाज माध्यमांवरून कथितरित्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. प्रकरण इतके वाढले की, हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अशी माहिती आहे की, अल्पसंख्याक समुदायाच्या एका तरुणाने कथितपणे केलेली आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी गावात तणाव पसरला.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमधील नीलकंठेश्वर मंदिरात २६ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या काही दिवसांनंतरच ही घटना घडली. त्या घटनेच्या आठवणी स्थानिक लोकांच्या मनात ताज्या असतानाच, हा प्रकार घडला. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच स्थानिक कार्यकर्ते सहकार नगरमधील तरुणाच्या घरी पोहोचले आणि त्यांनी तोडफोड केली. जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांमुळे परिस्थिती झपाट्याने बिघडली. यामुळे दुपारी यवत आठवडी बाजार बंद करावा लागला.

काही अज्ञात लोकांनी दोन मोटारसायकलींना आग लावली, तर परिसरातील दुसऱ्या समुदायाच्या धार्मिक स्थळावर दगडफेक झाली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. दोन्ही गटातील लोकांनी दगडफेक केली आणि टायर जाळले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या पोलिसांनी यवत गावात सुरक्षा वाढवली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. याप्रकरणी सय्यद नावाच्या एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.


Powered By Sangraha 9.0