तेजस्वी यादव यांचा मतदार यादीतून नाव गायब झाल्याचा दावा खोटा; निवडणूक आयोगाचे पुराव्यानिशी खंडन

02 Aug 2025 20:02:12

नवी दिल्ली,  बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी विशेष सघन पुनरीक्षण प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आपले नाव मतदार यादीतून गायब झाल्याचा आरोप केला होता. मात्र, निवडणूक आयोग आणि पटणा जिल्हा प्रशासनाने त्यांचा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला असून त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट केले आहे.

शनिवारी तेजस्वी यादव यांनी माध्यमांसमोर सांगितले की, माझे नाव मतदार यादीत नाही. मी निवडणूक कशी लढवणार?. आपण ईपीआयसी क्रमांक वापरून नाव शोधले, पण ते सापडले नाही. मात्र काही तासांतच निवडणूक आयोगाने अधिकृत निवेदन जारी करत स्पष्ट केले की तेजस्वी यादव यांचे नाव विशेष सघन पुनरीक्षण प्रक्रियेअंती तयार करण्यात आलेल्या ड्राफ्ट मतदार यादीत स्पष्टपणे समाविष्ट आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, तेजस्वी यादव यांनी त्यांच्या नावाचा यादीत समावेश नसल्याचा खोडसाळ आणि चुकीचा दावा केला आहे. वास्तविक, त्यांचे नाव मतदार यादीत अनुक्रमांक ४१६ वर समाविष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या वतीने करण्यात आलेला दावा तथ्यहीन आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पटणा जिल्हा प्रशासनानेही तत्काळ चौकशी सुरू केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी अधिकृत माहिती दिली की, तेजस्वी प्रसाद यादव यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट आहे. सद्यस्थितीत त्यांचे नाव बिहार अ‍ॅनिमल सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालय इमारतीतील मतदान केंद्र क्रमांक २०४ मध्ये अनुक्रमांक ४१६ वर आहे. त्यांनी याआधीच्या निवडणुकांमध्ये त्याच इमारतीतील मतदान केंद्र क्रमांक १७१ वर, क्रमांक ४८१ वरून मतदान केले होते. त्यांच्या मतदान केंद्रात झालेल्या फेरबदलामुळे, कदाचित त्यांनी नाव चुकून जुन्या केंद्रावर शोधल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Powered By Sangraha 9.0