विद्यार्थ्यांनी उद्योजक बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी : डॉक्टर रवींद्र प्रभूदेसाई

02 Aug 2025 16:09:18

खोपोली: कमी मार्क मिळाले की त्या विद्यार्थ्यांना भवितव्य नसते अशी धारणा चुकीची असून हुशार नसलात तरी कला, क्रीडा, वक्तृत्व यासारख्या बाबींमध्ये पुढे राहून आयुष्यामध्ये काहीतरी करता येते. दुसऱ्याकडे नोकरी का करायची? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर आपण आपला व्यवसाय निश्चित उभा करू शकतो , असे उद्गार पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभूदेसाई यांनी खोपोली येथे बोलताना काढले.

खोपोली ब्राह्मण सभेच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित व्याख्यान आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभूदेसाई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्टा लॅबोरेटरीजच्या संचालिका श्रीमती गीता धोटे उपस्थित होत्या. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष राजेंद्र पेठे,कार्यवाह वृषाली बेलसरे, खजिनदार सुधाकर भट, सह खजिनदार अपर्णा साठे याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरुवातीला लोकमान्य टिळक आणि भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण गेल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पेठे यांनी ब्राह्मण सभा करीत असलेल्या सामाजिक कामांची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर एडवोकेट विद्या डोंगरे यांनी लोकमान्य टिळक यांनी केलेल्या कार्याचा आढावा आपल्या भाषणामध्ये घेतला. मुलांनी मोबाईल मध्ये न अडकता सभोवतालचं ज्ञान आत्मसात करणे गरजेचं आहे. आपण काहीतरी बनवू शकतो का याचा विचार केला पाहिजे. ब्रेनला ब्रँडची जोड दिली की व्यवसाय जोरात होऊ शकतो .व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी रिस्क घेण्याची तयारी पाहिजे, असेही प्रभूदेसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले.

गीता धोटे यांनीही याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास पाठक यांनी केले तर शेवटी कीर्ती कुलकर्णी यांनी आभार मानले.


Powered By Sangraha 9.0