सनातन आतंकवाद म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक; टिळक भवनावर धडक मोर्चा

02 Aug 2025 16:22:13

मुंबई : भगवा आतंकवाद म्हणण्याऐवजी हिंदू किंवा सनातन आतंकवाद म्हणा, असे वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात सध्या सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. शनिवार, २ ऑगस्ट रोजी मुंबईत शिवसेनेने आक्रमक होत काँग्रेसच्या टिळक भवनावर धडक मोर्चा काढला.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसला जोरदार चपराक बसली. यावरून प्रचंड टीका झाल्यानंतर काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा हा पवित्र शब्द असून त्याऐवजी हिंदू किंवा सनातन दहशतवाद म्हणा, असे विधान केले होते. त्यामुळे त्यांचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी राज्यभरात ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात निदर्षने करण्यात आली.

टिळक भवनावर शिवसेनेचा मोर्चा

पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करण्यासाठी शिवेसनेने टिळक भवन येथे जाऊन काँग्रेस कार्यालयाला कुलूप लावून बंद करण्याचा प्रयत्न केला. या मोर्चात आ. डॉ. मनीषा कायंदे, शायना एनसी, शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी त्यांना रोखून धरले. या मोर्चादरम्यान, काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यासोबतच ठाण्यातही पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात युवा सेना आक्रमक झाली. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आनंद आश्रमाबाहेर आंदोलन करण्यात आले.


Powered By Sangraha 9.0