पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

02 Aug 2025 14:29:09

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यमातून तयार होणारा विकास आराखडा महत्वपूर्ण ठरेल.

‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’ला गती देण्याचे काम नीती आयोग करणार आहे. याबाबतचा आराखडा महाराष्ट्र शासन पीएमआरडीए करणार असून त्याला पुणे इंटरनॅशनल सेंटर मदत करणार आहे. नियोजित पद्धतीने विकास केल्यास जीवनशैलीतील सुलभताही साध्य करता येऊ शकते. आज ६५ टक्के जीडीपी शहरांच्या आजूबाजूच्या परिसरातून येतो. योग्य नियोजनातून ही वाढ गतिमान करता येऊ शकते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तयार केल्याने चांगली परिसंस्था निर्माण झाली. मात्र यापेक्षाही चांगल्या प्रकारची औद्योगिक विकासाची परिसंस्था तयार केल्यास त्याचा अधिक मोठा परिणाम होईल. आर्थिक वाढीतूनच चांगले सामाजिक वातावरण निर्माण होऊ शकते, असेही मत मुख्यमंत्र्यांनी मांडले.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे प्रमुख पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे आदी उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0