महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची परीक्षा पुन्हा होणार विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मंडळाला आदेश

    02-Aug-2025   
Total Views |

मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची परीक्षा पुन्हा होणार असून यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जुलै २०२५ सत्राची परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील परीक्षेत २ हजार १५२ विद्यार्थ्यांचे निकाल नियमभंग केल्याच्या कारवाईत राखून ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील परीक्षा एआय आधारित प्रॉक्टोर्ड तंत्रज्ञान वापरून बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात घेण्यात आल्या.

७ जुलै २०२५ रोजी परीक्षा संपल्यानंतर १७ जुलै २०२५ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या सत्रात ३६ हजार २०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २ हजार १५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमभंग केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले. त्यापूर्वी झालेल्या सराव परीक्षेत विद्यार्थ्यांना एआय सुरक्षा आणि प्रॉक्टोर्ड प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली होती. मात्र, असे असतानाही परीक्षेत नियमभंग झाल्याचे आढळून आले होते.

२३ ऑगस्ट रोजी होणार पुनर्परीक्षा

मंडळामार्फत प्रमाणपत्र, पदविका आणि प्रगत पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात. केवळ नियमभंग या कारणास्तव विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिनाभरात फेर परीक्षा घेण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत. त्यानुसार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी पुनर्परीक्षा आयोजित केली जात आहे. राखीव निकाल असलेल्या आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही विशेष संधी दिली जात आहे.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....