नांदेड: "समरसता हा सामाजिक जीवनात जगण्याचा महत्वाचा विषय असून साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. परिवर्तनासाठी प्रवर्तन आवश्यक आहे,म्हणूनच समाजनिष्ठ साहित्यनिर्मिती ही काळाची गरज आहे. त्यामुळे भारत अधिक सुदृढ व शक्तिशाली राष्ट्र होऊ शकतो," असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त व पद्मश्री नामदेवराव कांबळे यांनी केले. ते श्रीगुरूगोविंदसिंह साहित्यनगरी नांदेड येथील २० व्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते.
समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचा प्रारंभ सकाळी भव्य ग्रंथदिंडीने झाला. संमेलनाचे उद्घाटन समरसता साहित्य परिषदेचे संस्थापक प्रा. रमेश महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे, साहित्यिक अक्षयकुमार काळे, बाबा गुरु सतनामसिंग, कार्यवाह माणिक भोसले, निमंत्रक शिवा कांबळे, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे, प्रा. बालाजी वाकोडे पाटील, समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदापुरे, कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पद्मश्री कांबळे म्हणाले, “समाजप्रबोधन हे साहित्याचे खरे कार्य असून त्यातूनच समतेची नवी दिशा मिळू शकते. समरसतेवर आधारित जीवनमूल्यांची जपणूक ही आजच्या समाजाची गरज आहे.”
संमेलनात पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री भिकुजी दादा इदाते, प्रा. रमेश पांडव, प्रा. शेषराव मोरे, गोविंद नांदेडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. प्रसन्ना पाटील यांनी समरसता ही पांडित्याची नव्हे, तर अनुभूतीची बाब असल्याचे सांगितले. कार्यवाह माणिक भोसले यांनी नांदेड शहरातील नागरिक व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
राज्यसभा खासदार आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अजित गोपछडे म्हणाले, “या संमेलनात विविधतेची लोकसंस्कृती सहभागी झाल्याने समाजात एकात्मता वाढीस लागेल. समाजजीवनात उदात्त जीवनमूल्ये रुजवणारे साहित्य निर्माण होणे अत्यावश्यक आहे.”
डॉ. रमेश महाजन यांनी नांदेडकरांनी या संमेलनाची उंची वाढविल्याची स्तुती केली. “हे संमेलन भविष्यातील संमेलने कशी घ्यावीत यासाठीचा माईलस्टोन ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.
साहित्यिक अक्षयकुमार काळे म्हणाले, “समरसतेची जाणीव आणि भावनिक एकात्मता निर्माण करणारे साहित्य हेच सच्चे साहित्य आहे. या संमेलनातून विचारांना नवी दिशा मिळेल.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गजानन होडे व डॉ. रमा गर्गे यांनी केले. प्रारंभी ‘ज्ञानभारती विद्यामंदिर’च्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी ‘समरसता साहित्य संमेलनाच्या स्मरणिके’चे आणि ‘साहित्य पत्रिके’चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या भव्य साहित्य संमेलनातून समाजमनात समरसतेचा विचार रुजावा, सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण साहित्य निर्माण व्हावे आणि विचारवंतांची पुढील पिढी घडावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.