नागपूर :"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित शिक्षण व दर्जा प्राप्त करत, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने वंचित समाजासाठी शिक्षणाचे दार खुले करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले. या महाविद्यालयाची गेल्या ६० वर्षांची गौरवशाली परंपरा अधिक विस्तारून गुणवत्तेचा प्रवास नवनवीन शिखर गाठेल, असा माझा ठाम विश्वास आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दीक्षाभूमी स्मारक समिती संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, डॉ. कमलताई गवई, सुधीर फुलझेले, राजेंद्र गवई, प्रदीप आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, "स्वतःचा विकास साधतानाच मागास घटकांना पुढे घेऊन जाण्याचे महान विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिले. त्यांच्याच विचारांची शिदोरी घेऊन विद्यार्थी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी."
यावेळी त्यांनी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे, सदानंद फुलझेले या थोर कार्यकर्त्यांच्या योगदानाची आठवण करून देत, "या महाविद्यालयासाठी आयुष्य वेचणाऱ्यांना खरी आदरांजली म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा अंगिकार करून विद्यार्थ्यांनी यशस्वी होणे," असे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यात महाविद्यालयाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने सातत्याने कार्य करणाऱ्या या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.