महाराष्‍ट्र शासन, बृहन्‍मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलिस व रेल्‍वे प्रशासन यांच्‍यातील सतर्कता व समन्‍वयामुळे मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात ; मंगल प्रभात लोढा

    19-Aug-2025
Total Views |

मुंबई : मुंबई महानगरात गत दोन दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे. तथापि, महाराष्‍ट्र शासन, बृहन्‍मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलिस व रेल्‍वे प्रशासन यांची सतर्कता व आपसातील योग्‍य समन्‍वयामुळे मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळावर कार्यरत आहेत. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनातर्फे केलेल्‍या सूचना व आवाहनांना प्रतिसाद द्यावा. तसेच, काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. 

भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिका (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात आज (दिनांक १९ ऑगस्ट २०२५) दिलेल्या अतिमुसळधार पावसाच्या (Red Alert) पार्श्वभूमीवर, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट दिली. या कक्षातून मुंबईतील पावसाच्या स्थितीचा त्‍यांनी सविस्‍तर आढावा घेतला. त्‍यावेळी लोढा माध्‍यमांशी बोलत होते. 

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती , अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉक्‍टर अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (आपत्ती व्यवस्थापन) शरद उघडे यावेळी उपस्थित होते.

लोढा पुढे म्‍हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून पावसाच्या स्थितीचा आणि वेळीच करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. महानगरपालिकेचे संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, कामगार आदी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर (on field) कार्यरत असून आवश्यक सर्व उपाययोजना करत आहेत. तथापि, काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लोढा यांनी केले. 

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्‍हणाले की, गत ४८ तासापासून मुंबईत अतिजोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज (दिनांक १९ ऑगस्ट २०२५) देखील अतिमुसळधार पावसाचा (Red Alert) इशारा दिला आहे. त्‍यानुसार, सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्‍यात आली आहे. त्‍याचबरोबर राज्‍य शासनाशी सल्‍लामसलत करून आज शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे. तसेच, खासगी कार्यालयांनी कर्मचा-यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्‍याची मुभा द्यावी, असे आवाहन केले आहे. यामुळे वाहतुकीवरील ताण कमी झाला आहे. मुंबईत काही ठिकाणी गत २४ तासात ३०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असतानादेखील महानगरपालिका, पोलिस, रेल्‍वे, राष्‍ट्रीय आपत्‍ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळावर अथक कार्यरत आहेत. सखल भागातील पाणी उपसा करण्‍यासाठी आवश्‍यकतेनुसार २५६ उपसा संच कार्यरत आहेत. उपनगरिय रेल्‍वे सेवा सुरळीत सुरू आहे.

आयुक्त गगराणी पुढे म्‍हणाले की, सततच्‍या पावसामुळे मिठी नदीच्‍या पातळीत आज सकाळपासून वाढ होत आहे. आधी ही पातळी ३.९ मीटर इतकी होती. त्‍यात काहीशी घट झाली आहे. खबरदारी म्‍हणून नदीकाठच्‍या रहिवाशांचे नजिकच्‍या महानगरपालिकेच्‍या शाळांमध्‍ये स्‍थलांतर करण्‍यात येत आहे. आज महानगरपालिका प्रशासन, पोलिस आणि राष्‍ट्रीय आपत्‍ती प्रतिसाद दल यांनी मिळून सुमारे ४०० रहिवाशांचे स्‍थलांतर केले आहे. त्‍यांची निवासाची, जेवणाची व्‍यवस्‍था महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्‍यात आली आहे. जर मिठी नदीच्‍या पाणीपातळीत वाढ झाली तर नदीकाठच्‍या रहिवाशांचे स्‍थलांतरण करण्‍यात येईल. त्‍यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्‍ज आहे. आजच्‍या उच्‍चतम भरतीची मर्यादा संपली असून पावसाचा जोर कमी झाल्‍यास सखल भागात साचलेल्‍या पाण्‍याचा लवकर निचरा होईल, असेदेखील गगराणी यांनी नमूद केले.  हवामानाच्‍या अंदाजानुसार, पुढील काही तासात फार मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्‍याची शक्‍यता आहे. याचा विचार करून नागरिकांनी सतर्क राहावे. काळजी घ्‍यावी. अत्‍यावश्‍यक असेल तरच घराबाहेर पडावे. बृहन्‍मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिस यांनी वेळोवेळी दिलेल्‍या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनदेखील गगराणी यांनी केले. 

पोलीस आयुक्त देवेन भारती म्‍हणाले की, दोन दिवसांपासून सुरू असलेल्‍या पावसाच्‍या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांनी महानगरपालिका, रेल्‍वे व इतर यंत्रणांशी समन्‍वय साधून कडेकोट बंदोबस्‍त तैनात केला आहे. रस्‍ते वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. ज्‍या ठिकाणी पाणी साचले आहे, त्‍या ठिकाणची वाहतूक वळविण्‍यात येत आहे. शाळा - महाविद्यालयांबरोबरच शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुटी दिल्‍याने वाहतुकीवरील व यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.