द म्युन्सिपल को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक पुढे ढकला; बीएमसी सहकार पॅनलची विनंती

    19-Aug-2025   
Total Views |


मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक अशी ओळख असणा-या 'द म्युन्सिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई' यांची दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी होणारी पंचवार्षिक निवडणूक व मतदान प्रक्रिया पुढे ढकलावी, अशी विनंती बीएमसी सहकार पॅनलने सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक यांना केली आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबई परिसरासाठी दि. १९ आणि २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला आहे. तसेच दि. २१ ऑगस्ट रोजीदेखील अशीच पावसाळी परिस्थिती असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर 'द म्युनिसिपल कॉपरेटिव बँक लिमिटेड' या बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा भाग म्हणून येत्या गुरूवारी म्हणजेच दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी होणारे मतदान पुढे ढकलावे, अशी विनंती 'बीएमसी सहकार पॅनल'च्या वतीने सहकार खात्याला करण्यात आली आहे.

'द म्युनिसिपल कॉपरेटिव बँक लि.' यांचे पात्र मतदार हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामगार आणि कर्मचारी आहेत. त्यांना मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी जाणे कठीण आहे. तसेच पाऊस थांबल्यानंतरदेखील महानगरपालिकेच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना त्यापुढील १ ते २ दिवस साफसफाईचे काम करावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेता अशा परिस्थितीत मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी होऊन त्याचा प्रतिकूल परिणाम लोकशाही प्रक्रियेच्या परिणामकारक अंमलबजावणीवर होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन २१ ऑगस्ट रोजी होणारे मतदान पुढे ढकलावे, अशी विनंती बीएमसी सहकार पॅनेलचे अभय जगताप आणि गणेश पुराणिक यांनी पॅनलच्या वतीने केली आहे.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....