सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीविरोधातील याचिका फेटाळली

19 Aug 2025 11:17:32

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी २०२४ नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची वैधता आव्हान करणारी याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्या. एन. के. सिंह यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीस आली होती.

ही याचिका चेतन चंद्रकांत आहिरे यांनी दाखल केली होती. त्यांनी असा आरोप केला होता की सायंकाळी मतदान संपल्यानंतर सुमारे ७५ लाख बनावट मतदारांनी मतदान केले आणि त्यामुळे संपूर्ण निकाल अवैध ठरवावा.

या प्रकरणी आहिरे यांनी जून २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्याने असेही म्हटले होते की सुमारे ९५ मतदारसंघांमध्ये नोंदवलेले मतदान व मोजणीच्या आकडेवारीत मोठे विसंगती आढळल्या.

तथापि, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने या आरोपांना फेटाळून लावत याचिकेवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. या याचिकेमुळे न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया गेला, असे ताशेरे उच्च न्यायालयाने नमूद केले होते. सर्वोच्च न्यायालयानेही हाच निर्णय कायम ठेवत याचिका ग्राह्य धरण्यास नकार दिला.


Powered By Sangraha 9.0