कल्याण, कल्याण पश्चिम स्मार्ट सिटी अंतर्गत रेल्वे स्टेशन परिसरात रखडलेले सॅटीस कामामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयावर रिक्षा चालक मालक असोसिएशनच्या वतीने बुधवारी दि. २० ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्काळीत झाले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या जनतेला उगीच वेठीस धरले जाऊ नये याकरिता हा मोर्चा तूर्तास मागे घेण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत उड्डाण पूल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या आधारखांबामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. या अरूंद मार्गिकेतून वाट काढत जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. सकाळच्या वेळेत कामावर जाताना मुरबाड रस्ता, गुरूदेव हॉटेल, शिवाजी चौक मार्गे आल्यानंतर ही रेल्वेस्थानक भागात वाहतूक कोंडीचा प्रवाशांना सामना करावा लागत आहे. सायंकाळी कामावरून परतल्यावर ही तोच प्रकार असतो. त्यामुळे कल्याण शहरातील वाहतूक कोंडीचे हे विघ्न संपणार कधी असा प्रश्न नागरिकासह वाहनचालक करत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे भेडसावणा:या समस्या दूर करण्यासाठी रिक्षा चालक मालक असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु संघटनेने नमूद केलेल्या समस्या सोडविण्यासाठी स्मार्ट सिटीचे महापालिका अधिकारी यांनी काही अवधी मागितला आहे. आगामी गणेशोत्सव सणासुदीचे दिवस व अतिवृष्टीमुळे यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आंदोलनामुळे रिक्षा वाहतुक सेवा विस्काळीत होऊन नागरिकांना त्रस होऊ नये यासाठी तूर्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.