मुंबई : भारतीय रेल्वेने गणेशभक्तांसाठी यंदा दरवर्षीपेक्षा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याचे नियोजन केल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने महाऱाष्ट्र शासनाने केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेला गणेशभक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्री कोकणात तसेच अन्यत्र जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी दरवर्षीपेक्षा जादाच्या ३६७ फेऱ्यांचे नियोजन केले जाईल, असे सांगितले असून यासंदर्भातील एक पत्र आम्हाला पाठवले आहे," असे त्यांनी सांगितले. तसेच यामुळे कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसह इतर भागात राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात रेल्वेची व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.