मिठी नदी धोक्याच्या पातळीवर पण पालिकेचा ॲक्शन प्लॅन तयार; उपमुख्यमंत्री शिंदेंकडून परिस्थितीचा आढावा

19 Aug 2025 17:05:40

मुंबई : (Mumbai Rains Update) गेल्या २४ तासांपासून मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सोमवारी बरसलेल्या तुफान पावसाने मुंबईकरांची अक्षरश: दाणादाण उडाली. मुंबई उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्कालीन पावले उचलण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या संकटाला तोंड देण्यासाठी मुंबई तसेच ठाणे पालिकेची काय तयारी आहे? याबाबत सर्व माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्याच्या पावसाचा आढावा घेऊन पत्रकार परिषदेत प्रशासनाच्या तयारीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "मुंबई आणि उपनगरांमध्ये पाणी भरले आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. सहा तासांमध्ये २०० मिमी आणि २४ तासांत ३०० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मिठी नदीलाही पूर आला आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. तुंबलेले पाणी काढण्यासाठी मुंबईत जवळपास ५२५ पंप सुरु करण्यात आले आहेत. १० मिनी पंपिंग स्टेशन आहेत. होल्डिंग पाँडही ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे एकंदरीत कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मिठी नदीला आलेल्या पुराचा धोका ओळखून ३०० जणांचे आपण स्थलांतर केले आहे. मुंबईत जीवितहानी होऊ नये, नुकसान होऊ नये म्हणून सगळेच फिल्डवर काम करत आहेत. सहा पंपिंग स्टेशनही काम करत आहेत. कमी वेळात जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे".

मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून चुनाभट्टी स्टेशनवर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच गरज असेल तरच बाहेर पडा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.




Powered By Sangraha 9.0