संवादकौशल्ये : तणाव व्यवस्थापनाची प्रमुख गुरुकिल्ली

19 Aug 2025 17:47:51

अनेकवेळा तणावाचे मूळ हे परिस्थितीत नसून, आपण त्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो, यामध्ये असते. या प्रतिसादामध्ये संवादाची भूमिका फार मोठी आहे. कारण, योग्य संवाद झाल्यास अनेक वाद टाळता येतात, नाती घट्ट होतात आणि मानसिक शांतता मिळते.

गैरसमज, अस्पष्टता आणि अव्यक्त भाव, या गोष्टी तणाव वाढवतात. उदाहरणार्थ, सहकार्‍याला एखादे काम वेळेत न केल्याबद्दल आपण थेट दोष देतो, तेव्हा वाद उद्भवतो. परंतु, त्याच गोष्टीला शांतपणे, आदराने समजावून सांगितले, तर मतभेद टाळता येतात. म्हणूनच संवादकौशल्ये ही तणाव व्यवस्थापनाची प्रमुख गुरुकिल्ली आहे.

सक्रिय ऐकणे (Active Learning)

‘संवाद’ म्हणजे फक्त १५ टक्के लोक बोलतात आणि ८५ टक्के लोक शांतपणे ऐकतात आणि दुसर्‍याला काय म्हणायचे आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हे जर आपण समजून घेतले, तर या जगातील बहुतेक समस्या कमी होऊ शकतात. ‘ऐकणे’ म्हणजे फक्त कानाने शब्द ऐकणे नव्हे, तर मनापासून लक्ष देऊन समोरच्याचा हेतू समजून घेणे होय. जेव्हा आपण ऐकतो, तेव्हाच आपला आवाज दुसर्‍यांपर्यंत पोहोचतो. स्पष्टता ही संवादाची खरी शोभा आहे. स्वतःचे विचार आणि भावना स्पष्ट, परंतु सौम्य भाषेत मांडण्याची कला फार महत्त्वाची असते. टोलवाटोलवी करणारी वायरचना किंवा अप्रत्यक्ष टोमणे टाळले, तर अनावश्यक गैरसमज टळतात आणि संवाद अधिक सुसंवादी होतो.

सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद (Emphathetic Response)

दुसर्‍याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करणे, म्हणजे सहानुभूती. ‘तुला कठीण वाटत असेल हे मी समजू शकतो,’ असे वाय समोरच्याचा राग शांत करण्यास मदत करते. सहानुभूतीमुळे नातेसंबंध दृढ होतात आणि मानसिक तणाव कमी होतो.

अहिंसक संवाद (Non - Verbal Communication)

टोचून बोलणे, दोषारोप करणे, वेडावणे, आवाज चढवणे या गोष्टी अधिक वाद निर्माण करतात. त्याऐवजी आपल्या गरजा आणि भावना मी स्वतः या दृष्टिकोनातून व्यक्त करणे योग्य ठरते. उदा. बायको नवर्‍याला म्हणते, ‘तू नेहमी उशिरा येतोस.’ असे म्हणण्याऐवजी ती म्हणाली की, ‘तुझ्या उशिरा येण्यामुळे मला चिंता वाटते.’ असे म्हणणे अधिक परिणामकारक आणि योग्य ठरते. स्पष्ट बोलणे म्हणजे कठोर बोलणे नव्हे, ते म्हणजे सत्याला सौम्यतेचे वस्त्र चढवणे. जेव्हा आपण शांत, स्पष्ट आणि सहानुभूतीने संवाद साधतो, तेव्हा नातेसंबंध सुदृढ होतात. योग्य संवाद हा मानसिक आरोग्याचा पाया ठरतो.

कार्यस्थळी संवाद

काम हे अनेकांसाठी तणावाचे मुख्य कारण ठरते. अल्प वेळेत मोठ्या जबाबदार्‍या, अस्पष्ट अपेक्षा किंवा असह्य कामाचा भार सहज थकवा व बर्नआऊट निर्माण करतात. असा ताण मनात साठवण्याऐवजी वरिष्ठांशी थेट आणि सन्मानपूर्वक संवाद साधणे अधिक योग्य ठरते. नवीन जबाबदारी असह्य वाटत असल्यास, वस्तुनिष्ठपणे आपली अडचण मांडा : सध्याच्या मुदतींसह हा प्रकल्प स्वीकारल्यास गुणवत्तेवर परिणाम होईल, अशी मला भीती वाटते. आपण कामांच्या प्राधान्यांबाबत चर्चा करू शकतो का? वरिष्ठ ताण कमी करतीलच असे नाही, पण ते कामांचे विभाजन, वेळवाढ किंवा अतिरिक्त साधने यांसारखे सर्जनशील उपाय सुचवू शकतात. हाच नियम शैक्षणिक ताणालाही लागू होतो. अवघड अभ्यासक्रम असल्यास प्राध्यापक वा मार्गदर्शकांशी वेळेत संवाद साधल्याने ट्यूशन, अध्ययन गट किंवा इतर साहाय्याचे मार्ग खुलतात. नातेसंबंधांतील आरोग्यदायी संवाद नाती ही आधार देणारी असली, तरी गैरसमजांमुळे ती तणावाचे मुख्य केंद्रही ठरू शकतात. साध्या गोष्टी न बोलल्याने राग साचतो आणि तणाव वाढतो. वेळेवर संवाद साधल्यास वाद टाळता येतात. आरोप प्रत्यारोपाऐवजी ‘तू कधीच आवरून ठेवत नाहीस,’ या दोषारोपणापेक्षा अधिक रचनात्मक वाय आहे की, ‘कामावरून आल्यावर घर अस्ताव्यस्त दिसले की मला त्रास होतो,’ जे स्वतःची भूमिका व्यक्त करून संवादात सामंजस्य आणते. म्हणून ‘मी’ या स्वरूपातील वाये वापरा. तितकेच महत्त्वाचे म्हणजे ऐकण्याचे कौशल्य. समोरची व्यक्ती बोलत असताना मध्येच तोडू नका, अनेकदा केवळ आपल्या भावना ऐकल्या गेल्या, या जाणिवेनेच तणाव हलका होतो.

ताण-मौन सापळा

मनावर ताण आल्यावर अनेकजण गप्प बसतात. पण, मौन हा धोकादायक सापळा ठरतो. भावना शब्दांत मांडल्याने त्यांची तीव्रता लक्षणीय कमी होते. मनातील भावना शब्दांत व्यक्त न केल्यास त्या ओझे होतात; योग्य शब्दांत मांडल्यास त्या पूल बांधतात. जेव्हा आपण खिन्न मित्राला बोलायला प्रवृत्त करतो, तेव्हा त्याचे मन हलके होण्याची शयता खूप वाढते. व्यावहारिक उपाय रोजच्या जीवनात संवादकौशल्यांचा सराव म्हणजे एकप्रकारचं साधनाचं शास्त्र आहे. ‘सक्रिय ऐकणे’ हे त्यातील पहिले पाऊल. बोलणार्‍याच्या डोळ्यांत डोळे घालून, पूर्ण लक्ष देऊन ऐकणे. संवाद फक्त शब्दांचा खेळ नसतो; तो श्वासांच्या लयीत घडतो. राग आला, तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा श्वास स्थिर करा, क्षणभर मौन धरा. कठीण प्रसंगात भावना दडपण्याऐवजी त्यांना योग्य शब्दांत मांडल्यास मन हलके होते. कटु भाषेपेक्षा सौम्य शब्द वापरल्याने नाती घट्ट होतात. वाद उभा राहिला, तरी तत्काळ उत्तर देण्यापेक्षा काही क्षण थांबून विचारपूर्वक प्रतिसाद द्या. यातच शहाणपण आहे. शेवटी, ताण पूर्णपणे टाळता येत नाही; पण संवादकलेचा, ऐकणे, समजून घेणे, योग्य शब्दांत स्वतःला व्यक्त करणे, या त्रयीचा रोजच्या जीवनात समावेश झाला की, संवाद केवळ ‘तंत्र’ न राहता जीवनाचा ‘नैसर्गिक श्वास’ बनतो. अशा संवादातून नाती उजळतात, तणाव विरघळतो आणि अंतःकरणात शांततेचा झरा अखंड वाहात राहतो.
Powered By Sangraha 9.0