मुंबईत अतिवृष्टीपेक्षाही जास्त पाऊस; राज्यात १२ ते १४ लाख एकर शेतीपीकांचे नुकसान

    19-Aug-2025   
Total Views |

मुंबई : मुंबईत अतिवृष्टीपेक्षाही जास्त पाऊस झाला असून राज्यात १२ ते १४ लाख एकर शेतीपीकांचे नुकसान झाले आहे. याक्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. परंतू, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून त्यासंदर्भातील उपाययोजना करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील पावसाची माहिती दिली. ते म्हणाले की, "राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांतील अतिवृष्टीमध्ये जवळपास १२ ते १४ लाख एकर जमिनीवरील पीके बाधित झालेली आहेत. काही प्रमाणात जनावरांचे नुकसान झाले आहे. विशेषत: नांदेड जिल्ह्यातील ढगफुटीसदृष परिस्थितीत ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे."

"मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून काही भागात ३०० मिमीपर्यंतची अतिवृष्टी झाली आहे. मिठी नदी धोका पातळीवर गेल्यामुळे ४०० ते ५०० लोकांना तिथून हलवावे लागले. आता या नदीची पातळीसुद्धा हळूहळू कमी होत आहे. पुढच्या काळात वर्तवण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजांवर आम्ही नजर ठेवून आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: आपत्तीग्रस्त भागात गेले आहेत. याक्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. परंतू, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून त्यासंदर्भातील उपाययोजना कराव्या लागतील. सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकाला अलर्टवर ठेवले आहे. बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत, तर काही नद्या इशारा पातळीच्या वर जात आहेत. आपल्या बाजूच्या राज्यांसोबत संपर्क असून त्यांच्यासोबत विसर्गाचे नियोजन करतो आहोत. बाजूचे राज्यदेखील आपल्याला मदत करत आहेत. तेलंगणासोबतही योग्य प्रकारे संपर्क सुरु आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, "३०० मिमी पाऊस हा मोठा पाऊस मानला जातो. हा अतिवृष्टीपेक्षाही जास्त पाऊस आहे. मागच्या काळात मिठी नदीमध्ये कशा प्रकारे घोटाळे झाले याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आपल्यासमोर येत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळात मिठी नदीतून गाळ काढण्याच्या नावाखाली ज्यांना काम दिले होते त्यांनी काय केले हे आता समोर आले आहे. आता नव्याने ते काम करण्याचे आदेश राज्य सरकारने महानगरपालिकेला दिले असून आता पालिका ते काम करेल. बंगालच्या उपसागराच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, तो आहे तोपर्यंत अतिवृष्टी संभावित आहे. त्यामुळे इकडे रेड अलर्ट दिला असून त्याप्रमाणे मोठा पाऊस पडतो आहे. आपण दर तीन तासांनी अलर्ट देतो आहोत. कुठे आणि किती पाऊस पडणार, काय केले पाहिजे, हे सांगत आहोत," असेही त्यांनी सांगितले.

नुकसानभरपाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
"जिथे जनावराचे आणि घराचे नुकसान झाले आहे किंवा दुर्देवाने मृत्यू झाला आहे, तिथे जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत. एनडीआरएफच्या नियमानुसार जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करु शकतात. तसेच शेतीसंदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले असून त्यानुसार मदत केली जाईल."

गणेशोत्सवाच्या निमित्ताने ३६७ अधिक फेऱ्या
"भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष ट्रेन चालवल्या जातात. यावर्षी जास्तीच्या गाड्या सोडव्या अशी विनंती आम्ही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती केली होती. त्यांनी एक पत्र आम्हाला पाठवले असून मागील वर्षीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास ३६७ फेऱ्या करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसह इतर भागात राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात रेल्वेची व्यवस्था उपलब्ध होणार आहे," असे सांगत मुख्यमंत्र्यांनी याबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....