मुसळधार पावसाचा महावितरण यंत्रणेला फटका

19 Aug 2025 16:39:22

कल्याण : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण, वसई, विरार परिसरातील महावितरण यंत्रणेला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परिणामी या परिसरातील सुमारे अडीच लाख वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला आहे. बंद करण्यात आलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कल्याण मंडळ कार्यालय-१ अंतर्गत येणाऱ्या नांदीवली, अडिवली, टिटवाळा, बदलापूर परिसरातील वीजपुरवठा प्रभावीत झाला आहे. मुसळधार पावसाचा सर्वात जास्त फटका वसई-विरार येथील वीज यंत्रणेला बसलेला आहे. वसई-विरार येथील १३०० रोहित्र पुराच्या पाण्यामुळे बंद करण्यात आले आहे. परिणामी येथील दोन लाखांपेक्षा अधिक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला आहे. बदलापूर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या भीनार पाडा येथील वीज यंत्रणेपर्यत पाणी आल्याने वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अभीयंता- जनमित्र युध्दपातळीवर कार्यरत आहेत. पुराचे पाणी ओसरल्यावर यंत्रणेची तपासणी करून वीज ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती महावितरण कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी दिली आहे.



Powered By Sangraha 9.0