नवी दिल्ली : भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आज नामांकन दाखल करणार आहेत. त्याचवेळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.
रालोआचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपले नामांकन दाखल करतील. यावेळी पहिले प्रस्तावक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वाक्षरी करतील. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री व रालोआचे अन्य नेतेही स्वाक्षरी करतील. नामांकन दाखल करताना रालोआचे शक्तीप्रदर्शनदेखील केले जाईल. संसदेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता सीपी राधाकृष्णन यांची निवड ही केवळ औपचारिकता असल्याचे मानले जाते.
दरम्यान, सीपी राधाकृष्णन यांना वायएसआरसीपी पक्षानेही पाठिंबा जाहिर केला आहे. वायएसआरसीपीचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्याशी विरोधी पक्षांनी संपर्क साधला होता, मात्र आपण रालोआ उमेदवारास पाठिंबा देण्याचा शब्द दिल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केल्याचे समजते.
काँग्रेसप्रणित इंडी आघाडीतर्फे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. बी सुदर्शन रेड्डी यांची ८ ऑगस्ट १९८८ रोजी उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आणि ते केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील बनले. बी सुदर्शन रेड्डी यांची १२ जानेवारी २००७ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ते ८ जुलै २०११ रोजी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी मार्च २०१३ मध्ये गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला. तथापि, ऑक्टोबर २०१३ मध्ये त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता.