
नवी दिल्ली, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये घोळ झाल्याचा आमचा यापूर्वीचा दावा खोटा असून, तो आमच्याकडून चुकीने करण्यात आला होता; असा माफिनामा ‘लोकनिती - सेंटर फॉर डेव्हलपिंग सोसायटीज’ अर्थात ‘सीएसडीएस’चे सहसंचालक संजय कुमार यांनी मंगळवारी केला आहे. त्यामुळे या आधारे ‘मतचोरी’च्या काँग्रेसच्या स्क्रिप्टचा अखेर बुरखा फाटला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सध्या ‘मतचोरी’ हे नवे नॅरेटिव्ह बाजारात आणले आहे. देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये घोळ होत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्या या दाव्याची अन्य विरोधी पक्षदेखील तूर्तास री ओढत आहेत. मात्र, ज्या ‘लोकनिती - सीएसडीएस’च्या अहवालावरून राहुल गांधी यांनी हे नॅरेटिव्ह उभे केले, तो अहवालच खोटा असल्याचे या संस्थेने जाहिर केले आहे.
‘लोकनिती - सीएसडीएस’ सहसंचालक संजय कुमार यांनी ‘एक्स’वर जाहीरपणे माफी मागितली. त्यांनी कबूल केले की पोस्ट केलेले आकडे चुकीचे होते आणि ही चूक डेटा टीमने केली होती. संजय कुमार यांनी ‘एक्स’वर लिहिले की, महाराष्ट्र निवडणुकीबाबत केलेल्या एक्स पोस्टबद्दल मी मनापासून माफी मागतो. २०२४ च्या लोकसभा आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या डेटाची तुलना करताना चूक झाली. डेटाची ओळ चुकीची वाचली गेली. संबंधित एक्स पोस्ट काढून टाकण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पसरवण्याचा माझा हेतू नव्हता. विशेष म्हणजे संजय कुमार यांच्या या माफिनाम्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीदेखील याविषयीच्या पोस्ट्स डिलीट करण्यास सुरूवात केली.
संजय कुमार यांनी आता डिलीट केलेल्या पोस्टमध्ये दावा केला होता की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या ४,६६,२०३ होती, तर विधानसभा निवडणुकीत ती २,८६,९३१ पर्यंत कमी झाली म्हणजेच सुमारे ३८.४५ टक्के घट झाली. त्याचप्रमाणे, देवळाली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत ४,५६,०७२ मतदार होते, तर विधानसभा निवडणुकीत ही संख्या २,८८,१४१ पर्यंत कमी झाली म्हणजेच ३६.८२ टक्के घट झाली.
अशी होती ‘लोकनिती - सीएसडीएस’ची अराजकतेची क्रोनॉलॉजी
· ११ ऑगस्ट २०२५ : संजय कुमार यांची एक्सवर पोस्ट. त्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्यो घोळ झाल्याचे आरोप. यानंतर त्याने सीएनबीसी आवाज नामक वृत्तवाहिनीवरील चर्चेतही असेच दावे.
· १७ ऑगस्ट २०२५ : संजय कुमार यांची एक्स पोस्ट. त्यामध्ये महाराष्ट्रातील निवडणुकीच्या डेटाचा स्क्रीनशॉट शेअर करून नाशिक पश्चिम मतदारसंघात 2024 लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारसंख्या 47.38 टक्के आणि हिंगणा मतदारसंघात 43.08 टक्के वाढ झाल्याचा दावा.
· १८ ऑगस्ट २०२५ (सकाळी): संजय कुमार यांचा ‘नवभारत टाइम्स’ या हिंदी माध्यमात लेख प्रकाशित. “वोट चोरी पर जवाब… चुनाव आयोग खुद ही अपने पैर पर मार रहा कुल्हाड़ी” या नावाच्या लेखात पुन्हा त्याचा आरोपाचा पुनरुच्चार.
· १८ ऑगस्ट २०२५ (रात्री) : अचानक आपला डेटा खोटा असल्याचा साक्षात्कार. त्यानंतर ट्विट डिलीट करून माफिनामा.
हा तर सोरोसप्रणित अराजकतावाद – भाजपचा हल्लाबोल
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. पत्रकारपरिषदेत ते म्हणाले, एकीकडे भारतीय जनता आणि भारतीय संविधानाची ताकद आहे; तर दुसरीकडे अराजकता आणि विध्वंसक असणारे राहुल गांधी यांचे मॉडेल आहे. ‘लोकनिती - सीएसडीएस’च्या अहवालावर राहुल गांधी यांचा दावा आधारित होता. मात्र, त्या संस्थेने आपला दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राहुल गांधी सोरोसच्या मार्गदर्शनाखाली अराजकता पसरवत असल्याचे भाटिया यांनी म्हटले आहे.
‘सीएसडीएस’ला नोटीस
लीगल राइट्स ऑब्झर्व्हेटरी या संस्थेकडून नोटीस ‘सीएसडीएस’ला कायदेशीर कारवाई करण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. आपल्या दाव्याची माहिती, आकडेवारी कुठून घेतली याविषयी ‘सीएसडीएस’कडे विचारणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील वकील विनीत जिंदाल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि संजय कुमार यांच्याविरोधात फेक न्यूज पसरवणे, नागरिकांना भडककविणे आणि केंद्र सरकारविरोधात षडयंत्र केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिल्ली पोलिसांना पाठवले आहे.