चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट - द्विपक्षीय संबंधांसाठी सीमेवर शांतता राखण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले

19 Aug 2025 20:37:09

नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चीनचे परराष्ट्रमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे पोलिटब्युरो सदस्य वांग यी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भारत-चीन सीमारेषेवर शांतता आणि स्थैर्य राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. द्विपक्षीय संबंधांसाठी सीमाशांतता ही आवश्यक अट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वांग यी यांनी पंतप्रधान मोदी यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा संदेश आणि तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेचे आमंत्रण दिले. पंतप्रधान मोदी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून ते या परिषदेस उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. त्यांनी चीनच्या अध्यक्षतेला पाठिंबा व्यक्त केला आणि या परिषदेदरम्यान पुन्हा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

वांग यी यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेचा तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांच्या सह-अध्यक्षतेखाली पार पडलेल्या २४व्या विशेष प्रतिनिधी बैठकीचा सकारात्मक आढावा पंतप्रधानांना दिला.

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी काझान येथे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये दिसत असलेल्या स्थिर आणि सकारात्मक प्रगतीचे स्वागत केले. परस्पर आदर, परस्पर हितसंबंध आणि परस्पर संवेदनशीलता या तत्त्वांच्या आधारे भारत-चीन संबंध पुढे सरकत असल्याचे त्यांनी नमूद केले. यामध्ये कैलास मानसरोवर यात्रेच्या पुनरारंभाविषयी त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.

सीमावाद प्रश्नावर भारताचा ठाम दृष्टिकोन स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी यांनी न्याय्य, तर्कसंगत आणि परस्पर मान्यताप्राप्त तोडगा काढण्यासाठी भारताची बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. त्यांनी स्थिर, विश्वासार्ह आणि रचनात्मक भारत-चीन संबंध हे प्रादेशिक तसेच जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असेही स्पष्ट केले. 


Powered By Sangraha 9.0