मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील तांत्रिक संवर्गातील गट-क श्रेणीतील विविध पदावर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.संचालनालयाच्या अखत्यारीतील विविध संस्थांमध्ये तांत्रिक संवर्गात कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती, मृत्यू आणि अन्य काही कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांवर सेवायोजन कार्यालयाकडून किंवा स्थानिक स्तरावर संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात २९ दिवस तत्त्वावर नियुक्ती देण्यात आली होती. अशा या १७ कर्मचाऱ्यांची सेवा अटी आणि शर्तींच्या अधीन राहून नियमित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.तसेच टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयासाठी दिलेल्या १० हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्य शासनाने हे शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी तांबाटी येथील दहा हेक्टर जमीन एक रूपया प्रतिवर्षी या नाममात्र दराने दिली आहे. या जमिनीच्या करारनाम्यावरील मुद्रांक शुल्कात सवलत मिळावी अशी विनंती टाटा मेमोरिअल संस्थेने केली होती. या रुग्णालयामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागासह, लगतच्या शहरातील नागरिकांना कर्करोगा संदर्भातील उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले सहकारी संस्थेस औद्योगिक वसाहतीसाठी जमीन
कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेस कोल्हापूर मधील कसबा करवीर येथील अडीच हेक्टर जमीन महिलांची सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे वेंगुर्ला-कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात असून या निर्णयामुळे वेंगुर्ला येथील कॅम्प गवळीवाडा येथील चार ते पाच पिढ्यांपासून वास्तव्य करत असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.