अतिवृष्टीच्या अनुषंगाने अधिक सतर्क राहा; आपत्तीग्रस्त भागात तात्काळ मदत पोहोचवा

19 Aug 2025 15:45:27

मुंबई :
अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी दिले. राज्यभरात सुरु असलेल्या अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात परिस्थितीचा आढावा घेतला.

तसेच त्यांनीसमुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधून मुंबईतील परिस्थितीचीही माहिती घेतली. नांदेड आणि रायगड जिल्ह्यातील परिस्थिती बघता संबधित जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून शासकीय यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पावसामुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, तातडीने मदत व बचाव कार्य यासंबंधी यंत्रणांनी कार्यक्षमतेने काम करावे, आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना योग्य वेळी सतर्कतेचे संदेश पाठवावेत, नद्यांच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक ते निर्णय घ्यावेत, तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आपत्तीग्रस्त भागात तात्काळ मदत पोहोचवावी, असे निर्देशही मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिले.


Powered By Sangraha 9.0