असे ‘पेस’दर्शन परत होणे नाही!

18 Aug 2025 11:49:36

काही कुटुंबामध्ये खेळाच्या माध्यमातून राष्ट्रसेवेचा वारसा असतो, असेच एक कुटुंब म्हणजे पेस कुटुंब! लिएंडर पेस हे नाव आज संपूर्ण भारताला ज्ञात आहे. त्यांचे वडील डॉ. वेसे पेस यांचाच वारसा लिएंडर पुढे नेत आहेत. डॉ. वेसे पेसे यांचे भारतीय क्रीडा क्षेत्रातील कार्य लाख मोलाचे आहे. नुकतेच त्यांच्या निधनाने भारतीय क्रीडा क्षेत्राची हानी झाली. त्या पार्श्वभूमीवर डॉ. वेसे पेस यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

सुवर्ण असो, रौप्य असो अथवा कांस्य असो; यांपैकी कोणतेही ऑलिम्पिक पदक हे कोणत्याही क्रीडापटूला मोलाचेच असते. ते पदकाचे मोल जितके अधिक असते; तितकेच किंबहुना त्या पदकाहूनही अधिक बहुमोल तो ऑलिम्पियन असतो. एखाद्याचे ते ऑलिम्पिक पदक हरवले, नाहीसे झाले आणि त्याप्रमाणेच तो पदक विजेता असलेला खेळाडूही आपल्याला पुन्हा दिसणार नसेल, तर हे किती वाईट असेल? याची कल्पना ज्याचा तोच करू शकतो. त्याचप्रकारे तो खेळाडू आपल्याला पुन्हा कधीच दिसणार नसेल, तर होणारे ते दुःख हे खेळाडूचे कुटुंबीय तसेच त्याचे प्रेमीजन यांना एकसारखेच होत असते.

आपले ते पदक जर दुसर्‍याकडून हरवले, तर होणारा मनस्ताप अधिकच वेगळा असतो. ते पदक जर आपल्याला आपल्याकडेच सापडत नसेल, तर त्याने होणार्‍या मनस्तापाचे वर्णन करायलाच नको. भारतीय हॉकीपटूंनी ऑलिम्पिकमध्ये पटकवलेल्या पदकांबाबतीत, घडलेल्या दोन अशाच घटनांची आज मला प्रकर्षाने आठवण येते.
पहिली आठवण येते ती स्वर्गीय सरदार बलबीर सिंह दोसांज (वरिष्ठ) यांची. ध्यानचंद यांच्यानंतरचा काळ गाजवत १९४८, १९५२ आणि १९५६ सालच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाला सुवर्ण मिळवून दिले होते. मात्र तत्कालीन भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून त्यांची ती पदके हरवली होती आणि शेवटपर्यंत त्याचा थांगपत्ताही लागला नव्हता. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने सरदार बलबीर सिंह यांच्याकडून, प्रदर्शनार्थ हेतूने स्वतःच्या ताब्यात ती पदके ठेवली होती.

ही एका पदकाची कथा! तर दुसरी एक गोष्ट ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार याने भारतातील एका प्रसिद्ध वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. ती मुलाखत होती १९७२ सालच्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये, अशोक कुमारच्या संघात भारताच्या कांस्यपदक विजेत्या संघातील डॉ. वेसे पेस यांना श्रद्धांजली वाहण्याबाबतची.
दोन वर्षांपूर्वी कोलकाता येथे झालेल्या त्यांच्या भेटीची आठवण अशोक कुमार यांना त्यावेळी झाली. "पेसने मला तेव्हा सांगितले होते की, त्याचे ऑलिम्पिक पदक शिफ्टिंग दरम्यान हरवले आहे. त्याला माझ्याकडून पदक घ्यायचे होते आणि त्याची प्रतिकृती बनवायची होती.” अशोक कुमार त्या वृत्तपत्रीय मुलाखतीत पुढे सांगत होते की, "मी त्याला माझे पदक, ऑलिम्पिक पदक, सहा महिन्यांसाठी दिले. ते सोडून देणे सोपे नव्हते. तुम्हाला माहिती आहेच त्याचा अर्थ काय आहे. पेसने हे पदक मुंबईतील कारागिरांकडे नेले. नंतर पुन्हा कोलकातामध्ये प्रयत्न केला. त्याने सगळीकडे प्रयत्न केले पण, त्याची प्रतिकृती कधीच बनवता आली नाही. शेवटी, त्याने मला ते परत दिले.” असे अशोक कुमार म्हणाले. अशा पदकाची प्रतिकृती जशी आपल्याला आता कधीच दिसणार नाही तसेच, पेस’दर्शनदेखील आता परत होणार नाही.


डॉ. वेसे पेस : भारतीय क्रीडा क्षेत्रातील शांत व्यक्तिमत्त्व एक ऑलिम्पियन आणि भारतीय वैद्यकशास्त्राचे प्रणेते डॉ. पेस, हे एका क्रीडा घराण्याचे कुलगुरू होते. दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी वयाच्या ८०व्या वर्षी निधन झालेले डॉ. वेसे पेस, हे एक व्यापक स्मरणीय वारसा मागे सोडत आणि पार्किन्सन आजाराशी दीर्घकाळ लढा देत कोलकाता येथे शेवटी ख्रिस्तवासी झाले.

त्यांचे निधन भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वांत प्रभावशाली पण कमी नावाजल्या गेलेल्या व्यक्तींपैकी एक मानले जाते. क्रीडेला वाहून घेतलेल्या कुलपतीला भारतीय क्रीडाविश्व आता मुकले आहे.

डॉ. वेस पेस (३० एप्रिल १९४५-१४ ऑगस्ट २०२५)
डॉ. वेस पेस हे माजी हॉकी मिडफिल्डर होते. त्यांनी १९७२ सालच्या ‘म्युनिक ऑलिम्पिक’मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या संघाने कांस्यपदक जिंकलेे तसेच, ते माजी बास्केटबॉल खेळाडू जेनिफर पेस यांचे पती आणि टेनिस खेळाडू लिएंडर पेस यांचे वडील होते. ते क्रीडा वैद्यकशास्त्रात डॉटरदेखील होते आणि त्यांनी ‘बीसीसीआय’च्या अ‍ॅण्टी-डोपिंग विभागात अनेक वर्षे काम केले. डॉ. वेसे यांनी कोलकाता क्रिकेट आणि फुटबॉल लबचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी संभाळली आहे.

हॉकी हा त्यांच्या क्रीडा जीवनातील फक्त एक अध्याय होता. नैसर्गिक खेळाडू असलेले पेस, हे स्पर्धात्मक पातळीवर क्रिकेट, फुटबॉल आणि रग्बीदेखील खेळले आहेत. मित्र आणि समकालीन लोक अनेकदा असे म्हणत असत की, पेस क्रिकेट बॅट किंवा रग्बी बॉलचा वापर जितक्या लीलया करत, तितकाच न्याय ते हॉकी स्टिकलाही देत.

दक्षिण गोव्यातील असोल्ना हे डॉ. वेस पेस यांचे गाव . या गावातूनच लिएंडर पेस (टेनिस), ऑलिम्पियन जोकिम कार्व्हालो (हॉकी) आणि तनिषा क्रॅस्टो (बॅडमिंटन)सारखे ऑलिम्पियन्स देशाला मिळाले आहे. खेळातून निवृत्त झाल्यानंतर डॉ. पेस यांनी क्रीडा वैद्यकशात्रात प्रभावी कामगिरी केली. कोलकाता विद्यापीठातून ‘एमबीबीएस’ पदवी मिळवून, ते त्यावेळी भारतात उदयाला येत असलेल्या क्षेत्रात एक अग्रणी व्यक्ती झाले होते. एक उत्तम मार्गदर्शक असलेल्या डॉ.पेस यांनी’भारतीय ऑलिम्पिक संघटना’, ‘आशियाई क्रिकेट परिषद’, ‘बीसीसीआय’ आणि इतर अनेक क्रीडा संस्थांसोबत जवळून काम केले आहे. खेळाडूंना जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल, याची त्यांनी खात्री केली. ते डोपिंगविरोधी शिक्षण, खेळाडू कल्याणकारी उपक्रम आणि वयपडताळणी कार्यक्रमांमध्येही मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. अनेकदा खेळाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी पडद्याच्या मागे राहू कष्ट करणार्‍यांपैकी ते होते.

प्रतिष्ठित कोलकाता क्रिकेट आणि फुटबॉल लबच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासह, नेतृत्वाच्या भूमिकांमध्येही त्यांची प्रशासकीय बुद्धिमत्ता चमकली. या पदांवर पेस यांनी सेवा दिलेल्या संस्थांचा वारसा जपताना आधुनिक, व्यावसायिक दृष्टिकोन आणण्यासाठीही प्रयत्न केले. त्यांच्या या कामगिरीसाठीच आज त्यांची आठवण काढली जाते.

पेस यांचा क्रीडा क्षेत्राच्या सेवेचा वारसा त्यांच्या कुटुंबाने पुढे नेला आहे. त्यांची पत्नी जेनिफर पेस स्वतः एक राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू होती, ज्यांनी भारतीय महिला संघाचे नेतृत्व केले. वेस पेस हे एका हिरोचे वडील म्हणूनच प्रामुख्याने ओळखले जात. त्यांचा मुलगा लिएंडर पेस १९९६ साली अटलांटा येथे ऑलिम्पिक कांस्यपदक आणि अनेक ग्रॅण्ड स्लॅम दुहेरी जेतेपदे जिंकून, भारताच्या सर्वांत प्रसिद्ध टेनिस खेळाडूंपैकी एक बनला.

वेस आणि लिएंडर हे भारतातील दुर्मीळ पिता-पुत्र जोडींपैकी एक आहेत. त्यांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये ऑलिम्पिक पदके जिंकली. या पिता-पुत्रांच्या कामगिरीने, क्रीडा प्रतिभेला आणि घरी रुजलेल्या मूल्यांनाही प्रतिबिंबित केले आहे. लिएंडरने अनेकदा त्याच्या वडिलांच्या शिस्त, लवचिकता आणि अढळ विश्वासाला, त्याच्या स्वतःच्या कारकिर्दीचा पाया म्हणून श्रेय दिले. डॉ. पेस यांच्याबद्दलचे सांगण्यासारखे अनेक किस्से त्यांच्या कुटुंबीयांकडे आहेत. डेव्हिस कप सामन्यांमध्ये, डॉ. पेस भारतीय टेनिस संघासाठी प्रेमाने ‘लकी मॅस्कॉट’ म्हणून ओळखले जात असत. जेव्हा जेव्हा डॉ. पेस स्टॅण्डमध्ये असायचे, तेव्हा आपल्याला विजय हमखास मिळत असे. वैद्यकीय संघात त्यांच्यासोबत काम करणार्‍यांना, त्यांच्या उपस्थितीनेच जखमी खेळाडूंना बरे करण्याची क्षमता प्राप्त होत असे. तरुण क्रीडा प्रशासकांसाठी डॉ. पेस एक उत्तम मार्गदर्शक होते. ज्ञानदान करण्यास आणि पुढच्या पिढीच्या विकासासाठी ते कायमच उत्सुक असत.

डॉ. पेस यांचा भारतीय खेळावरील प्रभाव परस्पर जोडलेल्या अनेक वारशांशी निगडित आहे.एका महत्त्वाच्या काळात पदक जिंकणारा ऑलिम्पियन म्हणून, खेळाडूंच्या काळजीला व्यावसायिक बनवणारा वैद्यकीय प्रणेता म्हणून, खेळाच्या नीतिमत्ता आणि वारशाचे रक्षण करणारा प्रशासक म्हणून आणि एक उत्तम पालक म्हणून. डॉ.पेस यांचे कुटुंब कायमच राष्ट्राला गौरव देत राहिले आहेत. या सर्व यशांमधूनही त्यांनी एक नम्रता कायम राखली होती, हे कौतुकास्पदच.

त्यांची कारकीर्द केवळ वैयक्तिक कामगिरीवर नव्हे, तर त्यांच्या मार्गदर्शनात यशस्वी झालेल्या इतरांच्या यशावर आणि कल्याणावर मोजली जाते. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे, जी हॉकी मैदानांपासून टेनिस कोर्टपर्यंत, वैद्यकीय कक्षांपासून प्रशासकीय मंडळांपर्यंत सर्वत्र जाणवणार आहे. परंतु, त्यांची कहाणी केवळ ऑलिम्पिक संग्रह आणि क्रीडा क्षेत्रातच नाही, तर भारतीय खेळाच्या नीतिमत्तेतही कायम राहील. उत्कटता, सचोटीने क्रीडेला वाहून घेतलेल्या कुलपतीला आज भारतीय क्रीडाविश्व मुकले असल्याने, असे पेस’दर्शन आता परत होणे नाही! या लेखाद्वारे आपण या अनोख्या कुलपतीला आपली श्रद्धांजली अर्पण करू.

श्रीपदा पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४

Powered By Sangraha 9.0