माळरान म्हणजेच गवताळ प्रदेशावरील सर्वोच्च शिकारी प्राणी म्हणजे लांडगा. दख्खन पठारावरील लोकजीवनातील कथा, दंतकथा आणि लोकसाहित्यामध्ये लांडग्याचे अनेक संदर्भ आढळतात. या कथांमध्ये त्याचा स्वभाव हा लबाड दाखवला गेल्यामुळे लोकांच्या मनात त्याच्याविषयी बर्याच अंधश्रद्धादेखील आहेत. शिवाय, त्याचा आवाजही अशुभ मानला जातो. मात्र, आजही धनगर समाजातील मेंढपाळ समुदाय लांडग्यासोबत सह्यद(सुहृद) नाते जपून आहे. गेल्या आठवड्यात दि. १३ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय लांडगा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने हे विशेष वृत्तांकन...
- लांडगा हा श्वानकुळातील प्राणी असून तो कुत्रा आणि कोल्हा या प्राण्यांपेक्षा आकाराने मोठा आहे.
- जगात लांडग्यांच्या ‘लाल लांडगा’, ‘पूर्व लांडगा’, ‘राखाडी लांडगा’, ‘आफ्रिकन सोनेरी लांडगा’, ‘इथोपियन लांडगा’ अशा पाच प्रजाती सापडतात.
- पाच मुख्य प्रजातींच्या वेगवेगळ्या उपप्रजाती जगातील विविध भागांत विखुरलेल्या आहेत.
- भारतात लांडग्याच्या ‘हिमालयीन लांडगा’ किंवा ‘तिबेटी लांडगा’ आणि ‘भारतीय राखाडी लांडगा’ अशा दोन उपप्रजाती आढळतात.
- महाराष्ट्रात ‘भारतीय राखाडी लांडग्या’चे अधिवास क्षेत्र ४० हजार, ११४ चौ. किमी क्षेत्रात पसरलेले आहे.
- राज्यात त्यांची संख्या ४०० एवढी गंभीर आहे.
पाळीव प्रजातींकडून वन्यप्रजातींवर होणार्या आक्रमणाची अनेक उदाहरणे राज्यात दिसून येतात. मात्र, यामधील दखल घेऊन त्यावर उपाययोजनात्मक काम करण्याचे उदाहरण म्हणजे ‘वूल्फ-डॉग’ किंवा ‘डॉल्फ’. लांडगा आणि भटके कुत्रे यांच्या संकरामुळे जन्माला आलेल्या या प्राण्याने मूळ जंगली लांडग्यांच्या जनुकीय साखळीला धक्का पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.
मिहिर गोडबोले